जिल्ह्यात २७ लाख ९२ हजार ७७३ मतदार
By admin | Published: February 21, 2017 03:25 AM2017-02-21T03:25:25+5:302017-02-21T03:25:25+5:30
जिल्हा परिषदेच्या ७५ गट आणि पंचायत समितीच्या १५० गणांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२१) सकाळी ७.३० ते सायंकाळी
पुणे : जिल्हा परिषदेच्या ७५ गट आणि पंचायत समितीच्या १५० गणांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२१) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र मतदान होणार आहे. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी सुमारे ३७५, तर पंचायत समितीसाठी ६४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
या वेळी प्रथमच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँगे्रस, काँगे्रस, शिवसेनेसह भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवत असून, बहुतेक सर्व ठिकाणी ही चौरंगी लढत होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी तब्बल २२ हजार २५५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी तीन-तीन वेळा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी स्वतंत्र अशा दोन स्वतंत्र ईव्हीएम मशीन देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ३ हजार ३६९ केंद्रांसाठी १० हजार २०० बॅलेट युनिट व ७ हजार ४८० कंट्रोल युनिटचा वाटप केला जाणार आहे.
८४ मतदान केंद्रे संवेदनशील
४जिल्ह्यात ८४ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या संवेदनशील मतदान केंद्रांवर अधिकचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक ३० हवेली तालुक्यात संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. खेड १३, दौंड १३, आंबेगाव ११, शिरूर ९, मावळ ७, इंदापूर १ संवेदनशील मतदान केंद्राचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेचे उमेदवार, कंसात गणांचे उमेदवार
४जुन्नर ३९ (७१), आंबेगाव २४ (४०), शिरूर २६ (४५), खेड २४ (४५), मावळ २० (४४), मुळशी १६ (३४), हवेली ६३ (११७), दौंड ३८ (४८), पुरंदर १८ (३८), वेल्हा १३ (२२), भोर १२ (२३), बारामती ३७ (५४), इंदापूर ४५ (६२).
उमेदवाराची कुंडली मतदान केंद्राच्या बाहेर लावणार
४जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवारांची संपत्ती, त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे याबाबत संक्षिप्त स्वरूपातील माहिती प्रत्येक मतदान केंद्रांच्या बाहेर दर्शनी भागावर लावण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय मतदार
जिल्ह्यात एकूण २७ लाख ९२ हजार ७७३ मतदार असून, यामध्ये १४ लाख १६ हजार ७११ पुरुष, तर १३ लाख २ हजार ४४६ महिला मतदार आहेत. यामध्ये तालुकानिहाय मतदार याप्रमाणे- जुन्नर २ लाख ६३ हजार, आंबेगाव १ लाख ७२ हजार, शिरुर २ लाख ३७ हजार, खेड २ लाख ४४ हजार, मावळ १ लाख ७६ हजार, मुळशी १ लाख २१ हजार, हवेली ४ लाख ५१ हजार, दौंड २ लाख ३५ हजार, बारामती २ लाख ४७ लाख, इंदापूर २ लाख ६६ हजार.