पुण्यात बस आहेत पण स्टॉप नाहीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 08:07 PM2018-04-21T20:07:07+5:302018-04-21T20:29:05+5:30
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका मिळवून चालवत असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात (पीएमपीएमएल) मध्ये दररोज १३०० च्या पुढे बस धावत असताना बसस्टॉपची मात्र दुरावस्था झाली आहे.
पुणे :एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना शहारातील सार्वजनिक वाहतुकीचीही अवस्था फारशी दिसत नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका मिळवून चालवत असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात (पीएमपीएमएल) मध्ये दररोज १३०० च्या पुढे बस धावत असताना बसस्टॉपची मात्र दुरावस्था झाली आहे.
शहरात व्यक्तींपेक्षा अधिक संख्येने गाड्या रस्त्यावर धावत आहेत. वेगवेगळ्या कारणांनी अरुंद होत चाललेले रस्ते आणि त्यातच वाढत्या वाहनांमुळे दररोज वाहतूक कोंडीचाही अनुभव येत असतो. या कारणांमुळे नागरिक सार्वजनिक वाहतुकीकडे वळण्याची शक्यता असताना मात्र असुविधांमुळे असा परिणाम होताना दिसत नाही. सध्या पीएमपीच्या स्वतःच्या मालकीच्या आणि भाडे तत्वावर मिळून मोठ्या संख्येने बस रोज धावत असताना लोकांना उत्तम प्रतीचे बसस्टॉप पुरवण्यास पीएमपी अयशस्वी झाली आहे.
अनेक ठिकाणी बसस्टॉपला छत नसून ऊन, पावसात त्यांचा काहीही उपयोग होत नाही. अनेक लोकप्रतिनिधी गरज नसणाऱ्या ठिकाणी लाखो रुपये खर्चून बसस्टॉप उभारतात.प्रभात रस्त्यावर पीएमपी बस कधीही येत नसताना तिथेही बस स्टॉप बघायला मिळत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी बस थांबा अतिशय लहान असून पुरेशा संख्येने प्रवासी त्यात उभेही राहू शकत नाही. त्याचा परिणाम अनेकजण रस्त्यात उभे राहत असल्याने वाहतुकीसाठी लहान रस्ता तयार होतो आणि अंतिमतः वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. काही बसस्टॉपवर अंधार असून जवळपास उजेडाचा खांब नसल्यामुळे महिलांना सुरक्षिततेची हमी वाटत नाही. त्यामुळे बहुतांश महिला पुढे येऊन थांबणे पसंत करतात.
याबाबत नागरिकांशी संवाद साधला असता नियमित प्रवास करणाऱ्या अश्विनी वैद्य यांनी कर्वेनगरच्या नव्या उड्डाणपुलाखाली बसस्टॉप नसल्याने रस्त्यावर उभे रहावे लागत असल्याची व्यथा सांगितली.अनेकदा समोरच्या दिशेने येणारी वेगवान वाहने अंगावर येतात की काय अशी भीतीही वाटत असल्याचे त्या म्हणाल्या. वारजे जकात नाका थांब्यावर प्रवासी पुढे जाऊन उभे राहतात तर बस स्टॉप कितीतरी पुढे आहे. याबाबत प्रवाश्यांना विचारले असता त्यांनी बस मागे थांबत असल्यामुळे स्टॉपवर उभं राहून काहीही उपयोग होत नसल्याचे सांगितले.