Chandrashekhar Bawankule: मुख्यमंत्रिपदावरून मतभेद नाहीत, जिंकून येणं हाच जागावाटपाचा निकष - चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 12:27 PM2024-10-18T12:27:57+5:302024-10-18T12:28:05+5:30
जात-पात-धर्माच्या आधारावर उमेदवारी देण्याचे काम महाविकास आघाडी करते, आम्ही गुणवत्ता वगळता कधीच या निकषांवर उमेदवारी देत नाही
पुणे: महायुतीमध्ये जागावाटप आणि मुख्यमंत्रिपद यावरून कोणतेही मतभेद नाहीत. जिंकून येण्याची क्षमता हाच आमचा जागावाटपाचा एकमेव निकष आहे. त्यानुसार सर्वजण तडजोड करतील, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बावनकुळे म्हणाले उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय सर्वस्वी संसदीय मंडळाचाच आहे. त्यामुळे उमेदवार यादी लवकरच जाहीर होईल, पण केव्हा हे मी सांगू शकत नाही. ज्याला उमेदवारी मिळेल, सर्वजण त्याचे काम करतील. जात-पात-धर्माच्या आधारावर उमेदवारी देण्याचे काम महाविकास आघाडी करते. आम्ही गुणवत्तावगळता कधीच या निकषांवर उमेदवारी देत नाही, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपद हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपद हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ अशी परिस्थिती असून मुख्यमंत्रिपदासाठीच ते आपापसांत लढत आहेत. शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहेत. नाना पटोले प्रत्येक सभेत मीच मुख्यमंत्री असा दावा करत आहेत. विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरातदेखील मुख्यमंत्रिपदावर दावा करत आहेत.