विस्तारित पुण्यात छोटी सभागृहे हवीत

By admin | Published: January 6, 2016 12:33 AM2016-01-06T00:33:36+5:302016-01-06T00:33:36+5:30

सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याला नेहमीच मान मिळत आला आहे आणि तो योग्यही आहे. शिक्षण, साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात पुणे आघाडीवर आहे.

There are small houses in extended Pune | विस्तारित पुण्यात छोटी सभागृहे हवीत

विस्तारित पुण्यात छोटी सभागृहे हवीत

Next

सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याला नेहमीच मान मिळत आला आहे आणि तो योग्यही आहे. शिक्षण, साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात पुणे आघाडीवर आहे. आवश्यक असणारे पोषक वातावरण असल्याने पुण्यातील साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचाल भविष्यातही सुरू राहील, अशी खात्री आहेच. अनेक दिग्गज कलाकार पुण्यात होऊन गेले. नवीन कलाकारांची वाटचालही दमदारपणे सुरू आहे. विशेष म्हणजे नव्या, उगवत्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम तेवढ्याच आत्मीयतेने केले जात आहे. हीसुद्धा तितकीच आवश्यक आणि उपयुक्त गोष्ट आहे.
काही वर्षांपूर्वीचा विचार केला तर सांस्कृतिक कार्यक्रम, मैफलींची संख्या कमी होती. पण आज अनेक कार्यक्रम, मैफली बघायला, अनुभवायला मिळत आहेत. पुण्याची ही वाटचाल सांस्कृतिक समृद्धीसाठी उपयुक्तच म्हणावी लागेल. एकाच वेळी, एकाच दिवशी अनेक चांगले कार्यक्रम असतील तर प्रेक्षकांना ते अडचणीचे जसे ठरू शकते असे म्हटले तरी कुठल्या कार्यक्रमाची निवड करायची, याचा पर्याय रसिकांना मिळू शकतो आणि साहजिकच चांगल्या कार्यक्रमांकडे रसिकांचा ओढा असू शकतो. चांगल्या कार्यक्रमांना हजेरी लावणे हे पुणेकर रसिकांचे वैशिष्ट्य आहेच. पण अडचण तेव्हा होते ज्या वेळी चांगले कार्यक्रम एकाच दिवशी आणि एकाच वेळी असतात. रसिक विभागला जाऊ नये, यासाठी आयोजकांनी एकमेकांशी समन्वय साधून नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
संगीताच्या क्षेत्रात आज जरी वेगवेगळे ट्रेंड येत असले तरी तरुणवर्ग अभिजात संगीताकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे. अभिजात संगीताकडे आकर्षित झालेल्या तरुणवर्गाची संख्यादेखील मोठी आहे. अभिजात संगीतावर आधारित चित्रपटांमुळेही हे दिसून आले आहे. सोशल मीडिया तरुणांच्या हाती असल्यामुळे एका क्लिकवर संगीत ऐकण्याची संधी मिळत असल्याने पोषक वातावरण निर्माण व्हायला उपयोग झाला आहे, असे म्हटले तरी काही चुकीचे नाही. अभिजात संगीताशी तरुणवर्ग भविष्यातही जोडलेला राहावा, ही इच्छा मात्र आहे.
पुण्याचा विस्तार वाढत आहे, सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या वाढत आहे हे जरी सुखावणारे असले तरी छोट्या-छोट्या मैफली आयोजित करण्यासाठी तशा सुविधा नाहीत. कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटले, की आर्थिक बाजू बघावीच लागते. अशा वेळी मोठी सभागृहे फायद्याची ठरू शकत नाहीत. विस्तारलेल्या पुण्याचा सांस्कृतिक चेहरा
अधिक ठळक करण्यासाठी विस्तारलेल्या भागात छोट्या मैफली, कार्यक्रमांसाठी सभागृहे उभारली जाणे आवश्यक आहे. यातून कलाकार आणि श्रोते यांच्यात थेट संवाद साधला जाऊ शकतो.
सेलिब्रेटी असतील अशा कार्यक्रमांना लोक गर्दी करतात, असे चित्र दिसू लागले आहे. यातील सगळेच कार्यक्रम दर्जेदार असतात असे नाही. कार्यक्रमांना सेलिब्रेटी नाहीत पण त्या कार्यक्रमांची गुणवत्ता काय आहे, हे प्रेक्षकांनी जाणून घेतले पाहिजे. छोट्या पण दर्जेदार कार्यक्रमांच्या, कलाकारांच्या पाठीशी रसिकांनी आज उभे राहण्याची गरज आहे.
भविष्यातही दर्जेदार संगीत टिकेल, अशी खात्री आहेच. कारण नाट्यसंगीत रंगभूमीवरून चित्रपटाच्या पडद्यावर गेले, तेथेही प्रेक्षकांनी ते आपलेसे केले. शास्त्रीय संगीतात रसिकांना आपलेसे करण्याची ताकद आणि जादू आहे. त्यामुळे अभिजात संगीताला मरण नाही. पण यात काळानुरूप बदल करणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी मैफली रात्र-रात्र चालायच्या. आज हे शक्य नाही. प्रेक्षकांकडेही वेळ नाही. प्राचीन काळापासून बदल होत आले आहेत. भविष्यातही बदल होत राहतील.

Web Title: There are small houses in extended Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.