कोयाळी रस्ता असून अडचण नसून खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:08 AM2021-07-23T04:08:20+5:302021-07-23T04:08:20+5:30
शेलपिंपळगाव : शेलगाव ते कोयाळी-भानोबा (ता. खेड) रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. परिणामी स्थानिक नागरिकांसाठी हा रस्ता म्हणजे ...
शेलपिंपळगाव : शेलगाव ते कोयाळी-भानोबा (ता. खेड) रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. परिणामी स्थानिक नागरिकांसाठी हा रस्ता म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ बनत चालला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांसह प्रवासी त्रस्त झाले असून डागडुजी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
चाकण-शिक्रापूर राज्यमार्गाला जोडणारा रस्ता असल्याने नित्याने मोठी वाहतूक येथून होत आहे. तसेच पुणे-नाशिक महामार्गावरून चाकण आद्योगिक वसाहतीकडे येणारी बहुतांशी अवजड वाहने या रस्त्याचा प्रवासास वापर करत आहेत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त अवस्थेत आहे. शेलगाव हद्दीतून कोयाळीपर्यंत जाणारा हा तीन किलोमीटर अंतराचा 'रस्ता आहे की पायवाट' असाच प्रश्न प्रत्यक्षदर्शींना पडत आहे.
संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यात पावसाचे दिवस असल्याने हे खड्डे अधिक रौद्र रूप धारण करत आहेत. रस्त्यावरून दुचाकी तसेच चारचाकी वाहन चालविणे एक आव्हान बनत चालल्याने वाहतूकदारही अक्षरशः वैतागले आहेत.
गावातील नागरिकांची दळणवळणाची समस्या लक्षात घेऊन उपलब्ध निधीतून तत्काळ रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ तसेच वाहतूकदारांकडून केली जात आहे.
चौकट : कोयाळी रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र कोयाळीपासून शेलगावपर्यंतचा रस्ता अनेक दिवसांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. सध्या रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. परिणामी दहा मिनिटांच्या प्रवासासाठी स्थानिक नागरिकांना अर्ध्या तासाहून अधिक वेळ खर्ची करावा लागत आहे.
कोयाळी रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. स्थानिक नागरिकांची दळणवळणाची गरज लक्षात घेऊन संबंधित रस्त्याचे नव्याने सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुमारे पाच कोटींचा निधी मंजूर करून दिला आहे. संबंधित रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावून स्थानिक नागरिकांना दिलासा दिला जाईल.
निर्मला पानसरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद पुणे.
२२ शेलपिंपळगाव
शेलगाव-कोयाळी रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाण्याची डबकी तयार झाली आहेत. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)