"एक वर्षापासून नगरसेवक नाही, प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले", वसंत मोरेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 01:43 PM2023-02-09T13:43:02+5:302023-02-09T13:44:01+5:30
पुण्यातील आमदार खासदारांनी जरा नगरसेवकाच्या चपलेत पाय घालून पहावे
पुणे: आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला रोजी पार पडणार आहे. पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड येथे रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दोन्हीकडे भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर प्रचारालाही जोरडा सुरुवात झाली आहे. अशातच मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ताशेरे ओढले आहेत. मागील एक वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे.
मोरे म्हणाले, माझा शिंदे - फडणवीस सरकारला एक प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाच्या दोन आमदारांचा नुकताच मृत्यू झाला. अजून त्यांच्या सरणाची राख निवली सुद्धा नसेल. तर तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या. मग मागील एक वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे. विकास कामे ठप्प झाली आहेत. निधी नसल्यामळे नागरिकांना थोबाड दाखवू वाटत नाही. पुण्यातील आमदार खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पहावे. आणि हो जर कोणत्या पक्षाला सहनुभुती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असताल. तर तुमचा पराभव निश्चित समजा कारण जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार असंही ते यावेळी म्हणाले आहेत.