राज्यात पुढील दोन - तीन दिवस दुपारी ऊन अन् सायंकाळी पावसाची शक्यता
By श्रीकिशन काळे | Published: April 21, 2024 04:52 PM2024-04-21T16:52:12+5:302024-04-21T16:52:32+5:30
सध्या ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे मग पावसाची हजेरी होत आहे
पुणे: राज्यामध्ये आणि पुण्यामध्ये पुढील दोन-तीन दिवस दिवसा आणि रात्री उष्णता असणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये दुपारी कडक उन्ह आणि सायंकाळी पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागामध्ये रविवारी (दि.२१) वरूणराजाची हजेरी लागणार आहे, त्यामुळे दुपारी उन्ह आणि सायंकाळी पाऊस, अशा वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
राज्यात जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, बीड, लातूर, नांदेड, धाराशीव, औरंगाबाद, गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यामध्ये विदर्भामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. तेथील तापमान चाळीशीपार गेले आहे. तर पश्चिम भाग म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्रात ३० ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान नोंदवले जात आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी पुण्यातील तापमानाचा पारा चाळीशीपार गेला होता. पण रविवारपासून मात्र हा पारा ३९ वर आला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळत आहे.
सध्या ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि मग पावसाची हजेरी होत आहे. वादळी वारे येत आहे. असे वातावरण का झाले याविषयी डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, अरबी समुद्रावरून आणि बंंगालच्या उपसागराहून वारे येत असून, त्यांच्यासोबत बाष्प घेऊन येत आहेत. त्यात आपल्याकडे उच्चांकी तापमान आणि आर्द्रता या सर्व घटकांमुळे वादळी वाऱ्यासह, विजांचा कडकडाट आणि पाऊस होत आहे.