सणसूद आहे, भेसळ करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारा; ‘एफडीए’ मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा आदेश
By श्रीकिशन काळे | Published: October 12, 2023 04:56 PM2023-10-12T16:56:22+5:302023-10-12T16:57:41+5:30
मिठाई खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असून, यामध्ये खूप भेसळ होते, त्यामुळे त्यावर कडक नजर ठेवावी
पुणे : आता सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे मिठाई खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. यामध्ये खूप भेसळ होते, त्यामुळे त्यावर कडक नजर ठेवावी. हॉटेलमधील किचन अतिशय अस्वच्छ असतात. त्याची देखील तपासणी करून नागरिकांना चांगले पदार्थ मिळाले पाहिजेत, याकडे लक्ष द्यावे, नागरिकांनी तक्रारी केल्या, तर त्या त्वरीत सोडवा आणि अन्न पदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असा आदेश अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.
अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाची आढावा बैठक गुरूवारी शासकीय विश्रामगृहात पार पडली. या वेळी पुणे विभागाचे सहआयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त (औषधे) एस. व्ही. प्रतापराव, तसेच पुणे विभागातील अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त उपस्थित होते. आत्राम म्हणाले, अन्न व औषध प्रशासनाकडे अपुरे मनुष्यबळ आहे. ते बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच इतर यंत्रणेकडून ६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ‘एफडीए’च्या प्रयोगशाळेच्या इमारतीसाठी निधी मंजूर केला आहे. तसेच वाहनांची पूर्तता देखील होत आहे. संपूर्ण विभागाची रचना बदलून सुधारणा केली जात आहे.’’
‘एफडीए’च्या काही कार्यालयाच्या जागेचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याबाबत प्रस्ताव सादर करावेत. त्यावर निर्णय घेण्यात येईल. अन्न व औषध प्रशासनास दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त कामे करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. प्रशासनाच्या काही अडीअडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. तसेच कोणत्याही कामासाठी निधीची टंचाई भासू दिली जाणार नाही, असेही आत्राम यांनी सांगितले.
''सध्या ऑनलाईन खरेदीवरही नागरिकांचा कल वाढत आहे. त्यामुळे त्या खरेदीवर देखरेख ठेवणे आवश्यक आहे. कॉस्मेटिक, ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक उत्पादकांची तपासणी सातत्याने करणे गरजेचे आहे. कारण त्यातही फसवणूक होताना दिसून येते. यावर बारीक नजर ठेवावी. - धर्मरावबाबा आत्राम, अन्न व औषध प्रशासन मंत्री''