मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या लोकप्रियतेचा दावा; पुण्यातील राजकीय वर्तुळात घमासान युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 10:47 AM2023-06-14T10:47:17+5:302023-06-14T10:48:32+5:30

भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मग काय झाले, असे म्हटले जात आहे

There is a fierce war in political circles over Chief Minister Eknath Shinde's popularity claim | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या लोकप्रियतेचा दावा; पुण्यातील राजकीय वर्तुळात घमासान युद्ध

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या लोकप्रियतेचा दावा; पुण्यातील राजकीय वर्तुळात घमासान युद्ध

googlenewsNext

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लोकप्रियतेसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रियांचे घमासान युद्ध सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते अस्वस्थ तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मग काय झाले, असे म्हटले जात आहे. महाविकास आघाडीतील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हे तर होणारच होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर अन्य राजकीय पक्षांकडून यांच्याकडून साधनशुचितेची अपेक्षा तरी कशी करणार, असा प्रश्न केला.

आम्ही बरोबरच

जाहिरात आली याचा अर्थ मतभेद झाले असा होत नाही. त्यांना त्यांच्या सर्वेक्षणानंतर अशी जाहिरात करण्याचा पूर्ण अधिकार आहे. युतीमध्ये कसलेच वाद नाहीत. शिवसेना आमच्याबरोबरच आहे. आम्ही एकत्रच आहोत.- मुरलीधर मोहोळ- माजी महापौर, प्रदेश सरचिटणीस भाजप

त्यात गैर काय आहे?

आम्ही केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आम्ही जाहीर केला तर त्यात इतर राजकीय पक्षांना नाक खुपसण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे उत्कृष्ट काम करत आहेत हेच त्यातून सिद्ध होते. काहींना ते आवडत नसले तरीही ते सत्य आहे हे या सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.- किरण साळी- राज्य सचिव शिवसेना युवा सेना (शिंदे गट)

केविलवाणा प्रयत्न

राज्यात आपला कसलाही प्रभाव पडत नाही हे लक्षात असल्यामुळे प्रसिद्धीसाठी म्हणून केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. चुकीचे राजकारण कसे अंगलट येते हे आता उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर लक्षात येईल.- प्रशांत जगताप- शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

मतभेद जाहीर झाले इतकेच

त्यांच्यात मतभेद आहेच, ते यातून जाहीर झाले इतकेच. त्यातून कोण जास्त प्रसिद्ध, कोण कमी प्रसिद्ध हे दिसत नाही तर फोडाफोडीचे राजकारण जास्त काळ टिकत नाही हेच सिद्ध होते. काँग्रेसचा कायमच अशा राजकारणाला विरोध आहे.- मोहन जोशी- प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस

जनतेच्या पैशांने प्रसिद्धी गैर

जनतेच्या पैशांतून अशी प्रसिद्ध करून घेणे गैर आहे. पैसा खर्च करून जनतेच्या मनातील मुख्यमंत्री होता येणार नाही व कोणी त्यावर विश्वासही ठेवणार नाही. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच एकमेव आहेत.- संजय मोरे- शहराध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

पसंती दिली त्यापेक्षा जास्त जणांनी नाकारले

शिंदे गटाच्या वतीने सर्वेक्षण करणाऱ्यांनी बहुधा भाजपच्या नेतेमंडळींचे मत विचारात घेतले असावे. ४६ टक्के जनतेने त्यांच्या युतीला पसंती दिली असे त्यांचे म्हणणे आहे याचा अर्थ त्यापेक्षा जास्त टक्के जनतेने त्यांना नाकारले आहे असा निघतो. तो शिंदे गटाने आता मान्य करावा. - अनंत गाडगीळ, माजी आमदार, काँग्रेस

राजकारण कसले ते जाहीर करा

इतकी खुली व पारदर्शी राजकीय सत्ता स्पर्धा याआधी कधीही पाहण्यात आली नव्हती. खोके बोके यांच्यातच आता सुरू झाले आहे. जनतेचा कौल भाजपला नाही तर शिंदे गटाला हा सर्वेक्षणाचा निष्कर्षही भारी आहे. हे कसले राजकारण ते त्यांनीच आता जनतेसाठी जाहीर करावे.- मुकुंद किर्दत- जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी

Web Title: There is a fierce war in political circles over Chief Minister Eknath Shinde's popularity claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.