Maharashtra Rain Update: राज्यभरात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 12:05 IST2022-08-04T12:05:03+5:302022-08-04T12:05:11+5:30
भारतीय हवामानशास्त्र विभागाने हा अंदाज वर्तवला

Maharashtra Rain Update: राज्यभरात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
पुणे : राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे, मात्र गुरुवार सायंकाळपासून दाेन दिवसांसाठी पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. पुणे शहरातही पुढील चार दिवसांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, पश्चिमी वाऱ्यांचाही जोर वाढला आहे. मान्सूनच्या प्रवाहास अरबी समुद्र व पश्चिम बंगालमधील दोन्ही शाखा अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. त्यात बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून, त्याच्या हालचालीनंतर मान्सून राज्यावर जोमाने सक्रिय होईल, अशी माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली. त्यानुसार पुढील दोन दिवस कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या दोन दिवसांत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे, तर उर्वरित राज्यात पुढील दोन तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तसेच घाट परिसरात मुसळधार पाऊस पडेल.