टाकी आहे पण पाणी नाही, प्रवाशांचे हाल; स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्टॅन्डवरील स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 10:11 IST2025-02-19T10:11:04+5:302025-02-19T10:11:44+5:30
अस्वच्छ बसस्थानक, पाण्याच्या टाकीत पाणी नसणे, मोडलेल्या खुर्च्या, टाकीत पाणी नसणे, असेल तर तोटी नसणे, धुळीचे लोळ आणि स्थानकात खड्डे अशाही समस्या

टाकी आहे पण पाणी नाही, प्रवाशांचे हाल; स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्टॅन्डवरील स्थिती
अंबादास गवंडी
पुणे : स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारातून दररोज एक लाखापेक्षा जास्त नागरिक एसटीतून प्रवास करतात. बसस्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी पाण्याची टाकी बांधली आहे. मात्र या टाकीला ना तोटी आणि ना टाकीत पाणी अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना पाण्याची बाटली विकत घेऊन तहान भागविण्याची वेळ आली आहे.
पुण्यातून राज्यासह बाहेर एसटीची प्रवासी सेवा आहे. तसेच या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या उन्ह वाढत आहे. त्यामुळे तहान लागते. बाहेरून आलेल्या प्रवाशांना पिण्यासाठी पाण्याची सोय करणे आवश्यक आहे. मात्र स्वारगेट बसस्थानकातील टाकीत पाणी नाही. त्यामुळे प्रवाशांना पाणी विकत घेऊन प्यावे लागते.
शिवाय अस्वच्छ बसस्थानक, पाण्याच्या टाकीत पाणी नसणे, मोडलेल्या खुर्च्या, टाकीत पाणी असेल, तर तोटी नसणे, धुळीचे लोळ आणि स्थानकात खड्डे अशा विविध अडचणींना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी स्वारगेट बसस्थानकाचा विकास करण्यात येणार होता. मात्र मेट्रो स्थानक आणि स्वारगेट बसस्थानक मल्टीमाॅडेल हब करण्यात येणार असल्याने त्याचेही काम आता होणार नाही. त्यामुळे प्रवाशांना खड्ड्यातून प्रवास करावा लागणार असे चित्र दिसते.
एक हजार गाड्यांची ये-जा
पुण्यातील स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारातून दररोज जवळपास एक हजार गाड्या ये-जा करतात. यामध्ये राज्य आणि परराज्यातील गाड्यांचा समावेश आहे. यातून दीड ते दोन लाख प्रवासी ये-जा करतात. तुलनेने प्रवाशांना सुविधा न मिळाल्याने पैसे खर्च करुन पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे स्थानकातील असुविधेचा प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पुणे विभागातील सर्व बसस्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. ज्या ठिकाणी नाही त्याठिकाणी लवकरात लवकर करण्यात येणार आहे. - प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग
अशी आहे आकडेवारी
पुण्यात येणाऱ्या बस संख्या - ५००
बाहेर जाणाऱ्या बस संख्या - ५००
प्रवाशांची संख्या : दीड लाख