‘शिदं’च्या व्यंगचित्रांमध्ये असतो जिवंतपणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 12:22 PM2024-07-29T12:22:24+5:302024-07-29T12:23:13+5:30

रंगसंगती देखणी असते. गडद रंग वापरला, तरी ताे अंगावर येत नाही. रंग त्रासदायक होत नाही. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. 

there is life in the cartoons of s d phadnis | ‘शिदं’च्या व्यंगचित्रांमध्ये असतो जिवंतपणा!

‘शिदं’च्या व्यंगचित्रांमध्ये असतो जिवंतपणा!

चारूहास पंडित, प्रसिद्ध व्यंगचित्रकार

‘शिदं’ची शैली निर्विश विनोदाची शैली आहे. ते संस्कार माझ्यावर झाले. मी चिंटू करताना आनंद देणारा, निर्विश विनोद आपोआप आला. व्यंगचित्रकार अनेक पाहिले, पण ‘शिदं’ यांची छाप अमीट होती. त्यांच्या चित्रात एक लय आहे. एखादी व्यक्ती ही विशिष्ट लयीत उभी असते. त्यामुळे ते चित्र खूप आकर्षक होतं. चित्रात जिवंतपणा येतो. त्यांची रंगसंगती देखणी असते. गडद रंग वापरला, तरी ताे अंगावर येत नाही. रंग त्रासदायक होत नाही. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. 

मी अगदी लहान असताना ‘शिदं’ची भेट ही व्यंगचित्रांतून झाली. आमच्याकडे हसरी गॅलरी हे पुस्तक होतं. तेव्हा मी आठ-नऊ वर्षांचा असेन. माझ्या हातात ते पुस्तक पडलं आणि चित्रांची आवड लागली. आपण जे वाचतो, पाहतो त्यातून संस्कार होत असतात. तसे चित्रकलेचे माझ्यावर झाले. 

प्रत्येक कार्टून आपल्याला हसवतंच असं नाही. त्यात अनेक प्रकार असतात. टीका करणारी, बोचरी, नकारात्मक, अगदी डार्क कॉमेडी, असे अनेक प्रकार आहेत. पण, शि. द. फडणीस यांनी काढलेल्या कार्टून्ससाठी हास्यचित्र हाच शब्द अतिशय चपखल आहे. त्यांचं कोणतंही चित्र बघितलं की, चेहऱ्यावर आपोआप हास्याची लहर पसरते. कोणताही बोचरेपणा नसलेली ही चित्रे विनोदाची झालर लावून आपल्यासमोर येतात आणि आपलं मन प्रसन्न करून जातात. मनाला होणारा आनंद चेहऱ्यावर पसरतो आणि ओठांवर हास्य फुलते.

मी जेव्हा माझ्या लहानपणाच्या जडणघडणीकडे बघतो, तेव्हा मला अनेक संदर्भ आठवतात. एक अतिशय ठळक आठवण म्हणजे शि. द. फडणीस यांच्या हास्यचित्रांचं पुस्तक ‘हसरी गॅलरी!’ त्यावेळी मी नऊ-दहा वर्षांचा असेन. आमच्याकडील ‘हसरी गॅलरी’ हे पुस्तक मी वारंवार बघायचो. माझ्या व्यंगचित्रकलेचा पाया इथे भरला गेला असावा.  

शि. द. फडणीस यांच्या हास्यचित्रात त्यांची दोन्हीवरची हुकूमत दिसते. साध्या-साध्या गोष्टीतूनही ते इतके सुंदर कल्पना फुलवतात की, एखाद्या मुरलेल्या व्यंगचित्रकाराला हेवा वाटेल की, हे असं आपल्याला का नाही सुचत!  कल्पनेबरोबरच त्यांचं सादरीकरणही इतकं सुंदर आहे की, पन्नास-साठ वर्षांपूर्वी काढलेली हास्यचित्रे आजही ताजी टवटवीत वाटतात.  
रंग, रेषा आणि आकार यातून चित्रकार आपली कलाकृती फुलवत असतो. नेमकेपणाने सपाट पद्धतीने केलेले तरीही त्रिमितीचा आभास निर्माण करणारे रंगलेप, ठसठशीत प्रवाही रेषा, सौंदर्यपूर्ण आकार आणि मुख्य विषयाला उठाव देणारी पार्श्वभूमी यामुळे शि. द. फडणीसांची हास्यचित्रे नजरेला आनंद देतात. संपूर्ण चित्राला एक पेस्टल कलरचा फील आहे. त्याची रंगसंगतीतील कसब हे की, त्यांनी चित्रात अगदी ब्राइट कलर वापरले तरी हे ते रंग नजरेला न खुपता आल्हाददायक बनून चित्राचा एक भाग बनून जातात. त्यामुळे त्यांच्या हास्यचित्रांना ‘सौंदर्य चित्रे’ हा शब्दही वापरायला हरकत नाही ! त्यांच्या चित्रात एक लय असते. 

एका प्रकाशन समारंभात त्यांनी चिंटूबद्दल बोलताना उदाहरणादाखल एका चिंटूतील बारकावे सांगितले. त्या हास्यचित्रात चिंटूचे पप्पा चिंटूला गोष्ट सांगताहेत आणि चिंटू मांडीवर उशी घेऊन उशीवर कोपरे ठेवून, दोन्ही गालांवर हात धरून तन्मयतेने गोष्ट ऐकतोय. या चित्रातले बारकावे त्यांनी जेव्हा स्टेजवरून सांगितले, तेव्हा मला खूप आनंद झाला. मला जे म्हणायचे ते शि. द. फडणीस यांच्यासारख्या एका मोठ्या  व्यंगचित्रकाराने टिपले आणि आपण जे चित्रातून व्यक्त होतोय ते पोहोचतंय, आपण योग्य मार्गावर आहोत याची तेव्हा जाणीव झाली. मध्यंतरी काही वर्षे ‘कार्टूनिस्टस् कम्बाइन’चे काम बंद पडले होते, तेव्हा आम्ही पुढील पिढीतील काही व्यंगचित्रकारांनी एकत्र येऊन ही संस्था पुनरुज्जीवित करायचे ठरवले. त्यावेळी अध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला. 

फडणीस सर शंभरीत पदार्पण करत आहेत. आजही ते व्यंगचित्रकलेबद्दल तेवढेच उत्साही आहेत, जेवढे मी त्यांना ३५ वर्षांपूर्वी भेटलो होतो, तेव्हा होते. आजही त्यांना व्यंगचित्रकला, अर्कचित्र यात काम करणाऱ्या मुलांबद्दल तेवढेच कौतुक आहे. 

 

Web Title: there is life in the cartoons of s d phadnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे