Pune Porsche Car Accident: मुलाची बालसुधारगृहातून सुटका नाहीच! मुक्कामात २५ जूनपर्यंत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 11:09 AM2024-06-13T11:09:30+5:302024-06-13T11:12:13+5:30

Pune Porsche Car Accident अपघाताच्या दिवशीचे व्हिडीओ व्हायरल झाले असून, त्यातून मुलाची ओळख सार्वजनिक झाल्याने जिवाला धोका आहे, सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले

There is no escape for a minor child from a juvenile detention center! Extension of stay till June 25 | Pune Porsche Car Accident: मुलाची बालसुधारगृहातून सुटका नाहीच! मुक्कामात २५ जूनपर्यंत वाढ

Pune Porsche Car Accident: मुलाची बालसुधारगृहातून सुटका नाहीच! मुक्कामात २५ जूनपर्यंत वाढ

Pune Porsche Car Accident : मुलाचे मानसिकदृष्ट्या आणि व्यसनाधिनतेच्या बाबतीत अद्याप समुपदेशन सुरू आहे. मुलाची बालसुधारगृहातून सुटका झाल्यानंतर त्याचा ताबा कोणाकडे द्यायचा, हे अद्याप निश्चित झालेले नाही. अपघाताच्या दिवशीचे व्हिडीओ व्हायरल झाले असून, त्यातून मुलाची ओळख सार्वजनिक झाली आहे. त्यामुळे मुलाच्या जिवाला धोका आहे, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम २५ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे.

मुलाला आणखी १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचा अर्ज पुणेपोलिसांनी दाखल केला होता. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षा अक्षी जैन यांनी मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम वाढविण्याचा आदेश दिला. पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला १२ जूनपर्यंत बालसुधारगृहात पाठविण्याचा आदेश मंडळाने दिला आहे. ही मुदत संपत असल्याने पोलिसांनी मुलाला आणखी काही दिवस बालसुधारगृहात ठेवण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार मुलाला आणखी १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, असा अर्ज बुधवारी (दि. १२) दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे तपास अधिकारी असलेले सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी हा अर्ज केला. त्यानुसार मुलाला बालसुधारगृहात २५ जूनपर्यंत ठेवण्याचे आदेश मंडळाने दिले आहे.

दरम्यान अल्पवयीन मुलाचे वकील प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला की, बाल न्याय कायद्यात अल्पवयीन मुलाचा सुधारगृहातील मुक्काम वाढविण्याची कोणतीही तरतूद नाही. दि. २२ मेपासून या अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात ठेवले आहे. बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन तांत्रिकदृष्ट्या रद्द केलेला नाही, केवळ त्याला सुधारण्यासाठी ठेवले जावे, असे म्हटले आहे. 

मंडळात असलेल्या विविध तज्ज्ञांच्या माध्यमातून मुलाचे समुपदेशन सुरू आहे. मुलाला जामीन मिळाल्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढली होती. या गुन्ह्यात आत्तापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे. मुलाच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्याचा बालसुधारगृहात मुक्काम वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलाचा सुधारगृहातील मुक्काम १४ दिवस वाढविण्यासाठी अर्ज करण्यात आला होता.- सुनील तांबे, सहायक पोलिस आयुक्त

अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी

मुलाला सज्ञान ठरवत त्यावर खटला चालवायचा असेल तर या गुन्ह्यात पोलिसांना मुलाला बाल न्यायमंडळात हजर केल्यापासून ३० दिवसांत पोलिस तपासाचा अहवाल (दोषारोपपत्र) दाखल करावा लागणार आहे. बाल न्याय (काळजी आणि संरक्षण) कायद्यात त्याबाबत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिस तयारी करत असल्याचे त्यांनी मंडळात दाखल केलेल्या अर्जात नमूद आहे; मात्र पोलिसांनी आता अहवाल सादर करण्यासाठी १४ दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पोलिसांनी केली आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

आई-वडील, आजोबांच्या अटकेमुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम

मुलाने वृत्तपत्रात आई-वडील, आजोबा यांना अटक झाली, महाबळेश्वरचे रिसॉर्ट पडल्याच्या बातम्या वाचल्या. तो खूप अस्वस्थ झाला आहे. त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. त्याला त्यातून बाहेर काढण्याची गरज आहे असे मुलाच्या मानसिक विश्लेषण अहवालात नमूद करण्यात आले असून, बाल न्यायमंडळाकडे हा अहवाल सादर करण्यात आला आहे.

Web Title: There is no escape for a minor child from a juvenile detention center! Extension of stay till June 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.