राज्यात दहावी-बारावी परीक्षेच्या स्वरूपात तुर्तास बदल नाही- शरद गाेसावी
By प्रशांत बिडवे | Published: February 20, 2024 05:25 PM2024-02-20T17:25:49+5:302024-02-20T17:26:11+5:30
धाेरण जाहीर झाले म्हणजे लागलीच त्या वर्षापासून दहावी आणि बारावी परीक्षेचे स्वरूप बदलणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले....
पुणे : नवीन शैक्षणिक धाेरणानुसार अभ्यासक्रम तसेच परीक्षेचे स्वरूप बदलणार आहे. मात्र, हा बदल लागू हाेण्यासाठी किमान पुढील दाेन वर्षाचा कालावधी लागू शकताे असे मत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी व्यक्त केले. धाेरण जाहीर झाले म्हणजे लागलीच त्या वर्षापासून दहावी आणि बारावी परीक्षेचे स्वरूप बदलणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
एनसीईआरटी आणि प्रधान सचिवांसाेबत चर्चा झाली आहे. त्यानुसार सुरूवातीला नवीन अभ्यासक्रम लागू हाेईल आणि त्यानंतर परीक्षेचे स्वरूप बदलले जाणार आहे. मात्र, हा बदल करताना अचानक करता येत नाही. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये सकारात्मक निर्माण व्हावी लागते. पुढील वर्षापासून पहिला टप्प्यात दुसरी, तिसरी, सहावीची पुस्तके बदलण्याची शक्यता आहे. त्यानंतर दहावी आणि बारावीची पुस्तके बदलतील.
सध्या इयत्ता तिसरी ते बारावी च्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यावर (एससीएफ) मसुद्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर मसुदा अंतिम करून ताे सुकाणु समिती कडून मान्य करून घ्यावा लागेल. त्यातून सर्वप्रथम अभ्यासक्रम, पाठ्यक्रम तयार केला जाईल आणि त्यानंतर पाठ्यपुस्तके तयार हाेतील आणि त्या वर्षापासून नवीन अभ्यासक्रम बदलला जाताे असेही गाेसावी म्हणाले.