पुणे रेल्वेस्थानकात पाय ठेवायला जागा नाही; बाहेरगावी जाणाऱ्यांची वाढली संख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 12:48 PM2023-10-21T12:48:49+5:302023-10-21T12:49:20+5:30
प्रवासाचा विचार करून रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रवाशांनी सांगितले...
पुणे : दसरा, दिवाळी आणि छठपूजेसाठी पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुणे स्थानक शुक्रवारी प्रवाशांनी खचाखच भरले होते. फलाट क्रमांक एकवर तर पाय ठेवायला जागा नव्हती. तर बाहेर उन्हात थांबलेल्या प्रवाशांची संख्या लक्षणीय होती. अशा वेळी प्रवाशांच्या दृष्टीने सोय करणे गरजेचे आहे; पण याकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न पडत आहे. सण- उत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाकडून जादा गाड्यांची मागणी जोर धरत आहे. प्रवासाचा विचार करून रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
पुण्यातून दररोज ७२ गाड्या, तर पुणे रेल्वे स्थानकावरून साधारणपणे २०० ते २३० गाड्यांची ये-जा असते. पुणे रेल्वे स्टेशनवर ६ प्लॉटफार्मवर असून पुण्यातून दररोज दीड ते दोन लाख प्रवाशांची ये-जा करीत असतात. त्यात सण, उत्सवाच्या काळात प्रवाशांची संख्या लाखोंनी वाढली आहे. सध्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवाशांची ये-जा करण्याची संख्या वाढत आहे. त्यात यूपी, बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आणखी रेल्वे गाड्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे चित्र येथील गर्दीवरून स्पष्ट झाले आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच ७४ विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, यातील अधिक गाड्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोडण्यात आल्या आहेत. पुण्यातून सोडण्यात आलेल्या गाड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे अधिकच्या गाड्या सोडण्याची गरज असून, रेल्वे प्रशासनाने पुण्यातून विशेष गाड्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.