रुग्णालयाच्या खाजगीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव नाही; जिल्हा रुग्णालयाबाबत आरोग्य विभागाचा यु टर्न
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: May 25, 2023 05:27 PM2023-05-25T17:27:10+5:302023-05-25T17:27:18+5:30
रुग्णालयाच्या खाजगीकरणाबाबत कुठलाही शासन निर्णय अद्याप निर्गमित करण्यात आलेला नाही
पुणे : पुणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या खाजगीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव जिल्हा रुग्णालयाकडून शासनाला सादर करण्यात आलेला नाही. याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही असे स्पष्टीकरण पुणे परिमंडळचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी केले आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जिल्हा रुग्णालय पीपीपी तत्वावर चालवण्याबाबत मुंबईत एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत काय झाले हे देखील गुप्त ठेवले होते. यावरून काही दिवसात माध्यमाद्वारे जिल्हा रुग्णालयाच्या खाजगीकरणाबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. याबाबत आरोग्यमंत्री सावंत हे जिल्हा रुग्णालयाची जागा हडपण्याचा आरोप करत शिवसेनेने आंदोलनही केले होते. त्यांनतर आरोग्य विभागाने हे स्पष्टीकरण दिले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या खाजगीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव जिल्हा सामान्य रुग्णालय पुणे यांच्यावतीने उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ कार्यालयाकडे प्राप्त झालेला नाही. अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाकडून वरीष्ठ कार्यालयास सादर केलेला नाही किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव उपसंचालक कार्यालयास प्राप्त झालेला नाही. रुग्णालयाच्या खाजगीकरणाबाबत कुठलाही शासन निर्णय अद्याप निर्गमित करण्यात आलेला नाही. सदरच्या वृत्तात कोणतेही तथ्य नसून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही डॉ.पवार यांनी केले आहे. दरम्यान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही बैठक कशासाठी बोलावली होती याबाबत अजूनही त्यांनी किंवा आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिलेले नाही.