पिंपरी, आकुर्डी रेल्वे स्थानकांत ‘आरपीएफ’चा जवानच नाही! रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 04:27 PM2023-12-15T16:27:59+5:302023-12-15T16:28:07+5:30

या स्थानकांवरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आणि रेल्वे स्थानकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे...

There is no RPF soldier in Pimpri, Akurdi railway stations! Neglect of Railway Administration | पिंपरी, आकुर्डी रेल्वे स्थानकांत ‘आरपीएफ’चा जवानच नाही! रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

पिंपरी, आकुर्डी रेल्वे स्थानकांत ‘आरपीएफ’चा जवानच नाही! रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

पिंपरी : पिंपरी, आकुर्डी, दापोडी या रेल्वे स्थानकांत रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) एकही जवान तैनात नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या स्थानकांवरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आणि रेल्वे स्थानकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.

शहरात भोसरी, चाकण एमआयडीसी आणि हिंजवडी, तळवडे आयटी पार्क विकसित झाले आहेत. यामुळे लोणावळा, कान्हे, तळेगाव या ग्रामीण भागातून शहरात मोठ्या संख्येने नागरिक कामानिमित्त येत असतात. तसेच शहरात शाळा, कॉलेज आणि खासगी क्लासेसची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे उपनगर आणि ग्रामीण भागातून विद्यार्थी शहरात येतात. रेल्वेचा प्रवास जलद आणि स्वस्त असल्यामुळे त्याला प्राधान्य मिळते. पिंपरी, आकुर्डी, दापोडी स्थानकांत दररोज ४० लोकल थांबतात. पिंपरी स्थानकातून दररोज सरासरी ११ हजार, तर आकुर्डीतून दररोज १५ हजार नागरिक प्रवास करतात. ही दोन्ही स्थानके शहरातील महत्त्वाची स्थानके असून, आकुर्डीचा समावेश ‘अमृत भारत योजने’त झाला आहे. तेथे प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे; पण या दोन्ही स्थानकांसह आणखी ६ ते ७ स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) जवान नसल्याचे उघड झाले आहे.
रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण करणे, प्रवाशांची आणि स्थानकाची सुरक्षा करण्याची जबाबदारी आरपीएफ जवानांवर आहे; पण महत्त्वाच्या स्थानकांवरच आरपीएफ जवान तैनात नसल्यामुळे प्रवाशांच्या सामानाची चोरी होण्याच्या घटना घडतात. स्थानकात मद्यपी, भिकारीही घुसतात. यामुळे महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. स्थानकांची सुरक्षाही रामभरोसे आहे.

रेल्वे अपघातात ७८ जणांचा मृत्यू-

जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान पिंपरी ते तळेगाव स्थानकांदरम्यान झालेल्या विविध अपघातांत ७८ जणांचा मृत्यू, तर २१ जण जखमी झाले आहेत. बहुतांश अपघात रेल्वे लाईन ओलांडताना झाले आहेत. आरपीएफ जवान नसल्यामुळे नागरिक रेल्वे रूळ ओलांडताना दिसून येतात.

रेल्वे स्थानक - प्रतिमहिना प्रवासी संख्या

आकुर्डी - १५,७६५
पिंपरी - ११,४४५
चिंचवड - १४,५००
तळेगाव - २३,४००

पुणे विभागातील संवेदनशील आणि महत्वाच्या सर्वच स्टेशनवर आरपीएफ जवान तैनात केले आहेत. पण, मनुष्यबळ कमी असल्यामुळे काही स्टेशनवर आरपीएफचे जवान रात्री गस्त घालतात. जर सुरक्षेसंदर्भात काही तक्रारी आल्यास इतर ठिकाणी आरपीएफ कर्मचारी तैनात केले जातील.

- ज्योति मणि, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, पुणे  

Web Title: There is no RPF soldier in Pimpri, Akurdi railway stations! Neglect of Railway Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.