वाढत्या पाऱ्यामुळे पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर शुकशुकाट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 03:33 PM2019-04-27T15:33:56+5:302019-04-27T15:39:52+5:30
वाढत्या तापमानामुळे नेहमी गजबजलेला असणारा तसेच चालायला जागा उरणार नाही इतकी गर्दी असणाऱ्या लक्ष्मी रस्त्यावर आज मात्र शुकशुकाट पाहायला मिळाला.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. पारा हा 40 अंशाच्या वरच असलेला पाहायला मिळत आहे. शुक्रवारी तर पुण्यात 42.6 अंश सेल्सिअस तापमान हाेते. हे या शतकातील पुण्यातील सर्वाधिक तापमान असल्याचे म्हंटले जात आहे. या आधी 1897 मध्ये 43.3 अंश सेल्सिअस तापमान शहरात नाेंदवले गेले हाेते. या आठवड्यात तापमान सातत्याने चाळीसच्या वरच पाहायला मिळाले. या वाढत्या तापमानामुळे नेहमी गजबजलेला असणारा तसेच चालायला जागा उरणार नाही इतकी गर्दी असणाऱ्या लक्ष्मी रस्त्यावर आज मात्र शुकशुकाट पाहायला मिळाला. खास करुन दुपारच्यावेळी तुरळक वाहतूक या रस्तायावर पाहायला मिळाली.
सध्या पुण्यात मराठवाड्याप्रमाणे तापमान वाढले आहे. यापुर्वी दाेनदा तिनदा पारा चाळीस अंशाच्या वर गेला आहे. शुक्रवारी तर सर्वच रेकाॅर्ड माेडले. शुक्रवारी पुण्यात 42. 6 अंश सेल्सिअस इतके तापमान हाेते. आजही पारा 41 अंशावर असल्याचे पाहायला मिळत आहे. या वाढलेल्या तापमानामुळे नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. आज शनिवार असताना देखील पुण्यातली माेठी बाजारपेठ असणारा लक्ष्मी रस्ता सुनसान दिसत हाेता. अगदी तुरळक वाहतूक या रस्त्यावर सुरु हाेती.
शहरातील इतर रस्त्यांची देखील सारखीच परिस्थिती हाेती. नेहमी पार्किंगसाठी जागा नसणाऱ्या शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. दुपारच्यावेळेला नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. पहिल्यांदाच सातत्याने पारा चाळीशीच्या वर जात असल्याने नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत.