ऐतिहासिक चित्रपटांची आवड निर्माण करण्याची गरज
By admin | Published: February 19, 2015 01:20 AM2015-02-19T01:20:27+5:302015-02-19T01:20:27+5:30
आजच्या काळात थिल्लर चित्रपटांना तरुणाईची गर्दी होते; पण ऐतिहासिक चित्रपटांकडे पाठ फिरवली जाते, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.
पुणे : आजच्या काळात थिल्लर चित्रपटांना तरुणाईची गर्दी होते; पण ऐतिहासिक चित्रपटांकडे पाठ फिरवली जाते, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. ऐतिहासिक चित्रपट पाहण्याची आवड निर्माण करण्याचे काम झाले पाहिजे, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी व्यक्त केले.
‘अक्षरधारा बुक गॅलरी’च्या वतीने छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गो. नी. दांडेकर लिखित ‘शिवकाल’ या कादंबरीतील शिवराज्याभिषेकावरील ‘हे तो श्रींची इच्छा’ याच्या अभिवाचनाचा विक्रमी ६५0 वा प्रयोग नवी पेठेतील निवारा वृद्धाश्रमाच्या सभागृहात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.
याप्रसंगी प्रा. मिलिंद जोशी, गो. नी. दांडेकर यांची कन्या डॉ. वीणा देव, डॉ. विजय देव उपस्थित होते.
बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, की प्रवचन, कीर्तन, अभिवाचन ही वक्तृत्वाची प्रभावी माध्यमं आहेत. मात्र नव्या पिढीचा समज असा आहे, की प्रवचन म्हणजे बसून बोलणे आणि कीर्तन म्हणजे उभे राहून संवाद साधणे. पण सप्ताह, कीर्तन, प्रवचन यांमधून वक्तृत्वाचा आविष्कार साकारत गेला. आज माध्यमं भरपूर आहेत; पण त्याचा खरा कितपत उपयोग केला जातो, हाच मुळात प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.
‘‘विजयनगरचे साम्राज्य बुडाल्यानंतर शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे स्वातंत्र्याची चळवळ शिवरायांपासून झाली. पाश्चात्यांची आक्रमणे होत गेली, स्वातंत्र्याभिमान विरला. पण हिंदवी स्वराज्याच्या सामर्थ्यातून तो अभिमान पुन्हा जागृत झाल्याचे डॉ. विजय देव यांनी सांगितले.
या वेळी डॉ. वीणा देव, डॉ. विजय देव, रुचिर कुलकर्णी आणि विराजस कुलकर्णी यांनी सादर केलेल्या शिवराज्याभिषेकावरील अभिवाचनातून शिवकालाचे एकेक पर्व उलगडत गेले. संवादाची पकड... त्यातील चढउतार... यातून प्रत्येक पात्र त्यांनी रसिकांसमोर उभे केले. गागाभट्ट आणि शिवरायांमधील संवाद... शिवराज्याभिषेकामागची पार्श्वभूमी... या गोष्टींंमधून शिवकाल उपस्थितांनी अनुभवला. (प्रतिनिधी)
शिवरायांच्या जन्मापासून शेवटच्या घटकापर्यंत अशा पाच खंडांत मिळून ही एक कादंबरी साकार झाली आहे. ’शिवराय’ नव्हे तर ’काळ’ हा या कादंबरीचा गाभा आहे. शिवरायांच्या काळात राज्याभिषेक हा कळससाध्य होता.
- डॉ. वीणा देव