उन्हात पशू-पक्ष्यांची होतेय होरपळ, मुक्या जीवांसाठी प्रत्येकाने मदत करण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 03:01 AM2018-04-04T03:01:21+5:302018-04-04T03:01:21+5:30

घरातील पाळीव प्राण्यांसह पशू-पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहचत आहेत. अशामध्ये उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असून, मुक्या जिवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन प्राणिप्रेमी करीत आहेत.

there is a need for help of every animal and birds | उन्हात पशू-पक्ष्यांची होतेय होरपळ, मुक्या जीवांसाठी प्रत्येकाने मदत करण्याची आवश्यकता

उन्हात पशू-पक्ष्यांची होतेय होरपळ, मुक्या जीवांसाठी प्रत्येकाने मदत करण्याची आवश्यकता

Next

भोसरी - घरातील पाळीव प्राण्यांसह पशू-पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहचत आहेत. अशामध्ये उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असून, मुक्या जिवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन प्राणिप्रेमी करीत आहेत.
होळीनंतर उन्हाळा सुरू होतो. मात्र, यंदा होळीपूर्वीच उन्हाचा पारा चढला. हा पारा चाळिशीला टेकला आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलाच घाम फुटत आहे. पाळीव प्राणी, पक्षी वा अन्य वन्यचर प्राणी यांवर हवामानातील बदल याचा परिणाम होत असतो.
पाळीव प्राण्यांच्या शरीराचे तापमान मानवी तापमानापेक्षा अधिक असल्याने कडक उन्हाळ्यामध्ये त्यांना अनेक शारीरिक व्याधी उद्भवतात. शहरातील पशू-पक्ष्यांनाहीउन्हाचा फटका बसत आहे. उष्णतेमुळे प्राण्यांना डीहायड्रेशन होते. शरीरातले पाणी कमी झाल्याने ते आजारी पडतात.
विविध उन्हाळी सांसर्गिक आजार होतात. अशा प्राण्यांवर वेळेत उपचार न केल्यास त्यांचा प्राणही जाण्याची शक्यता असते.
पाळीव प्राण्यांना उपचार मिळतात. मात्र, इतर प्राण्यांना उन्हाच्या त्रासापासून वाचवणे अवघड झाले आहे. डीहायड्रेशनबरोबरच पचन संस्थेचे आजार, विविध प्रकारच्या जखमा, डोळ्यांचे विकार, श्वसन संस्थेचे आजार पशू-पक्ष्यांना होतात.
इतर वेळी शहरात उपलब्ध पाणी साठ्यांवर पशू-पक्षी आपली तहान भागवत असतात. शारीरिक थंडावादेखील शोधतात. मात्र, शहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नदीची पाणी पातळी घटत चालली आहे. खाणी, नैसर्गिक तळ्यांमधील पाणी आटले आहे. पाण्याच्या शोधार्थ पक्षी विहार करतात दिसतात.
सिमेंटच्या जंगलात झाडांची संख्या त्या तुलनेने कमी आहे. त्यातच नुकतीच पानगळ झाल्याने झाडे उघडीबोडकी दिसतात. त्यामुळे पुरेशी सावलीही पशू-पक्ष्यांना उपलब्ध होत नाही. सिमेंट, डांबरी रस्त्यांमुळे उन्हाचे चटके अधिक जाणवतात. त्याचा सर्वाधिक त्रास पशू-पक्ष्यांना होत आहे. त्यामुळे शहरात घर व परिसरात पशू-पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करावेत. कृत्रिम घरट्यांची सोय करावी, असे आवाहन प्राणिप्रेमींकडून करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

वाढत्या तापमानाचा फटका पशू-पक्ष्यांना बसत आहे. घार दुपारी उडत असते. दुपारच्या वेळेस प्रचंड प्रमाणात ऊन असते. त्यामुळे उष्माघाताचा धोका घारींना मोठ्या प्रमाणावर आहे. उष्माघात झालेल्या घारी उडत असताना अचानकपणे जमिनीवर पडतात. अशा घारींना काही काळ सावलीत ठेवा. तिच्या आसपास पाण्याची वाटी ठेवा. उष्माघाताने मरगळ येऊन पडलेले अन्य पक्षी आढळल्यास त्यांना हाताळू नका. त्यांना सावलीत ठेवा. पक्ष्यांना पाणी पाजायची विशिष्ट पद्धत आहे. मात्र आपण घाईघाईने पाणी पाजायला जातो. त्यामुळे त्यांच्या श्वासनलिकेत पाणी अडकून त्यांचा मृत्यू होण्याचा धोका असतो. पक्ष्यांना शक्य असेल, तर त्वरित महापालिकेचे प्राणिसंग्रहालय, पशुवैद्यकीय रुग्णालय अथवा जवळपास सर्पमित्र असल्यास त्यांच्याकडे सोपवावे. आपल्या घराच्या आसपास थंडाव्याच्या शोधात येणाºया पशू-पक्ष्यांना हटकू नका. गच्चीवर, बाल्कनीत पक्ष्यांसाठी पाणी ठेवून आपण त्यांचा उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करू शकतो.
- दीपक सावंत, अभिरक्षक, बहिणीबाई चौधरी प्राणिसंग्रहालय

प्राण्यांमधील उष्माघात कसा ओळखावा?
उष्माघात झालेले प्राणी अस्वस्थ होतात. त्यांचे श्वसन तोंडावाटे जीभ बाहेर काढून मोठ्या प्रमाणात होते. तोंडातून लाळ गळते. डोळे निस्तेज होतात. नाकपुडीत रक्ताची धार लागते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशा प्राण्यांना महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात दाखल करावे अथवा माहिती द्यावी. पशू-पक्ष्यांना छोट्याशा उपाययोजनांमधून उष्माघातापासून वाचवू शकतो. उष्माघाताचे प्राणी आढळल्यास या प्राण्यांच्या शरीरावर बर्फ लावावा अथवा थंड पाणी अंगावर शिंपडावे. माणसांप्रमाणेच प्राण्यांच्याही शरीरातील क्षारांची उन्हाळ्यात कमतरता होते. ती भरून काढण्यासाठी घरगुती साखरपाणी, आॅरगॅनिक गुळाचे पाणी अथवा ग्लुकोज डी उपयुक्त ठरते. उन्हाळ्यात प्राण्यांमध्ये बहुतांशी सांसर्गिक रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. त्यामुळे त्यांचे लसीकरण करणे आवश्यक असल्याचे महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे क्युरेटर दीपक सावंत यांनी सांगितले.

पाळीव प्राण्यांची अशी घ्या काळजी

स्वच्छ, थंडगार पाणी वारंवार उपलब्ध करून द्या
प्राण्यांना ताजे अन्न द्यावे
खाद्य व पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या भांड्याचा वापर टाळा
उन्हाळ्यात सहज पचेल असे व कमी प्रमाणात खाद्य द्या
प्राण्यांना डीहायड्रेशन होत असल्यास साखरपाणी, गुळाचे पाणी अथवा ग्लुकोज डी द्यावे
दुपारी १ ते ४ या वेळेत प्राण्यांना बाहेर मोकळे सोडू नये
प्राण्यांना उन्हात डांबरी रस्त्यावरून फिरवू नये
उन्हात लोखंडी पिंजºयात अथवा लोखंडी साखळ्यांनी प्राण्यांना बांधू नये.

Web Title: there is a need for help of every animal and birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.