बोगस ठरूनही डॉक्टरवर कारवाई नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:51 AM2018-02-06T00:51:01+5:302018-02-06T00:51:25+5:30
बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणे... एका वैद्यकीय शाखेची पदवी असताना दुस-याच शाखेचा व्यवसाय करणे... नियमबाह्यपणे डॉक्टर ही पदवी लावणे.
विशाल शिर्के
पुणे : बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणे... एका वैद्यकीय शाखेची पदवी असताना दुस-याच शाखेचा व्यवसाय करणे... नियमबाह्यपणे डॉक्टर ही पदवी लावणे... अशा बहाद्दरांवर कारवाई करण्यात महापालिका उणी ठरली आहे. डॉक्टर बोगस ठरूनही महापालिकेच्या जबाबदार अधिका-यांकडून संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. एका बोगस डॉक्टर प्रकरणात महापालिके विरोधात दावा दाखल झाल्याने विधी विभागाकडून सबुरीचा सल्ला दिल्याने काही डॉक्टरांवर महापालिका आयुक्तांनी आदेश देऊनही गुन्हा दाखल झालेला नाही. दाव्याची भीती आणि वैद्यकीय विभागातील काही अधिकाºयांची उदासीनता अशा दुहेरी कात्रीत शहरातील नागरिकांचे आरोग्य सापडले आहे.
महापालिकेच्या वतीने बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समिती स्थापन करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त त्याचे अध्यक्ष असून, त्यात ८ सदस्यांचा समावेश आहे. या समितीच्या बैठकीत दहा वैद्यकीय व्यवसाय करणाºयांबाबत तक्रार अर्ज दाखल झाले होते. समितीचे सदस्य गणेश बोºहाडे यांनी विनापरवाना व्यवसाय करणाºयांविरोधात तक्रार केली होती. रामकृष्ण कटकदौंड कोंढवा बिबवेवाडी रस्त्यावर व्यवसाय करतात. त्यांनी एमडी मेडिसीन असल्याचे भासवून व्यवसाय सुरू केला होता. तशी व्हिजिटिंग कार्डदेखील त्यांनी बनविली आहेत. याप्रकरणी बोºहाडे यांनी संबंधित व्यक्ती केवळ बारावी पास असल्याची तक्रार केली होती. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने डॉ. रामकृष्ण कटकदौंड या नावाची नोंदणी नसल्याचा अभिप्राय दिला आहे. कायद्याने अशी नोंदणी असल्याशिवाय वैद्यकीय व्यवसायच करता येत नाही. महापालिकेला जानेवारी २०१८ मध्ये तसे पत्र परिषदेने पाठविले होते. त्यानंतरही संबंधितांवर काहीच कारवाई झालेली नाही. कटकदौंड नक्की कितवी पास आहेत, याचा पुरावा समोर आलेला नाही.
बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीच्या बैठकीत आयुक्तांनी नॅचरोपथीचा व्यवसाय करणारे सुहास शेवाळे यांनी डॉक्टर उपाधी लावल्या प्रकरणी तीन दिवसांत पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिले होते. इलेक्ट्रोपथी मेडीकोज आॅफ इंडिया अणि नेचर क्युअरची पदवी असताना डॉक्टर नाव धारण केल्याप्रकरणी एस. एल. शिंदे यांच्या विरोधातही दावा दाखल करण्याचा आदेश दिला होता. मात्र, एका बोगस डॉक्टरप्रकरणी महापालिकेविरोधात दावा दाखल झाल्याने विधी विभागाकडून कारवाईबाबत सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे.
>डॉक्टर उपाधी लावणे सोडले
रामोशी आळीतील वैद्य सागर कुमार यांनी मूळव्याध आणि भगंदर व्याधीचा वैद्य असल्याचा बोर्ड लावला होता. मात्र, वैद्यकीय अधिकाºयांनी दिलेल्या भेटीत दवाखाना बंद होता. त्यानंतर अनेकदा भेट देऊनही संबंधित दवाखाना बंदच असल्याचे महापालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले. महापालिकेने कारवाईचा बडगा उगारताच काही जणांनी डॉक्टर ही उपाधी लावणे सोडून दिले आहे.
>महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने रामकृष्ण कटकदौंड याची नोंद नसल्याचा अभिप्राय दिला आहे. त्याप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश गेल्या आठवड्यात दिले आहेत. कटकदौंड यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित एका दाव्याशी निगडित आहेत. त्यामुळे विधी विभागाने तूर्तास त्यांच्यावर कारवाई न करण्याचा सल्ला दिला आहे.
- डॉ. वैशाली जाधव,
सहायक आरोग्याधिकारी
>महापालिका आयुक्त तथा बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीचे अध्यक्ष कुणाल कुमार यांनी चार महिन्यांपूर्वीच काही डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, एकाही व्यक्तीवर कारवाई झालेली नाही. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने रामकृष्ण कटकदौंड यांची नोंदणी नसल्याचे पत्र दिले आहे. आरोग्याधिकाºयांनी त्याप्रमाणे कारवाईचे आदेशही दिलेत. मात्र, त्यानंतरही वैद्यकीय अधिकाºयांकडून दोषी डॉक्टरांना पाठीशी घातले जात आहे. - गणेश बोºहाडे, सदस्य, बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समिती