‘ती’च्या स्वच्छतागृहांबाबत महिलांमध्ये प्रबोधनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 03:25 AM2018-12-10T03:25:47+5:302018-12-10T03:26:09+5:30

शहरात मध्यवस्ती, गर्दीच्या ठिकाणी स्वयंचलित पंखे, लाईट फ्लश, कपडे अडकवण्याचे हँगर, वेंडिंग मशीन, सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक मशीन अशी सर्व सोयी-सुविधायुक्त ‘ती’ स्वच्छतागृह, ई-टॉयलेटमुळे महिलांची चांगली सोय झाली आहे.

There is no awareness among women about her toilets | ‘ती’च्या स्वच्छतागृहांबाबत महिलांमध्ये प्रबोधनच नाही

‘ती’च्या स्वच्छतागृहांबाबत महिलांमध्ये प्रबोधनच नाही

Next

पुणे : शहरात मध्यवस्ती, गर्दीच्या ठिकाणी स्वयंचलित पंखे, लाईट फ्लश, कपडे अडकवण्याचे हँगर, वेंडिंग मशीन, सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक मशीन अशी सर्व सोयी-सुविधायुक्त ‘ती’ स्वच्छतागृह, ई-टॉयलेटमुळे महिलांची चांगली सोय झाली आहे. परंतु ई-टॉयलेट स्वच्छ व सोयीच्या ठिकाणी असली तरी त्यांच्या वापराबाबत महिलांना फारशी माहिती नसल्याने व वापरताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. यामुळे हे ई टॉयलेट वापराबाबत प्रबोधन करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले.

शहरात ठिकठिकाणी महिलांसाठी ई टॉयलेट्स तसेच ‘ती’ स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात आली आहेत. फर्ग्युसन कॉलेज रस्ता, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, सारसबाग अशा काही मध्यवर्ती ठिकाणी ही सोय करण्यात आली आहे. स्वच्छतागृह वापरासाठी साधारण पाच रुपये शुल्क आकारले जाते. या स्वच्छतागृहांमध्ये स्वयंचलित पंखे, लाईट, फ्लश, कपडे अडकवण्याचे हँगर, वेंडिंग मशीन, सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी मशीन अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. स्वच्छतागृहाबद्दल काही तक्रार असल्यास तिथे दिलेल्या क्रमांकावर संपर्क केल्यास तक्रार निवारणासाठी त्वरित काम केले जाते.

परंतु ही स्वच्छतागृहे वापरण्यासाठी महिला फारशा उत्सुक दिसत नाहीत. याची कारणे म्हणजे त्यांचा वापर करणे फारसे सोपे जात नाही. स्वच्छतागृहांवर वापरासंबंधी असलेल्या सूचना समजून त्याचा वापर करणे काही प्रमाणात अवघड जात आहे. तसेच काही तांत्रिक समस्यांचाही सामना करावा लागत आहे. काही टॉयलेट्सही त्यात पैसे टाकल्यावरच उघडतात. परंतु काही ठिकाणी असे दिसून आले, की पैसे टाकले तरीही काही वेळेस ती उघडत नाहीत किंवा काही वेळेला पैसे परत येतात. काही ठिकाणची स्वच्छतागृहे बंद अवस्थेत आढळली. या प्रकारच्या टॉयलेट्सबद्दल महिलांच्या मनात ती अस्वच्छ असतील, असा गैरसमज आहे, त्यामुळे काही जणी यांचा वापर करणे टाळत असल्याचे पाहणीमध्ये निदर्शनास आले. उपक्रम चांगला आहे परंतु या टॉयलेट्सच्या वापराबद्दल जागृती करण्यात यावी, तसेच यांची संख्याही वाढवण्याची गरज आहे.

आरोग्यदायक स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणार
सध्या शहरात महिलांसाठी आवश्यक तेवढी स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. परंतु महिलांसाठी स्वच्छ व आरोग्यदायक स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यासाठी ‘ई-टॉयलेट,’ ‘ती’ स्वच्छतागृह संकल्पना समोर आणली आहे. शहराच्या काही प्रमुख ठिकाणी ही स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भविष्यात जास्तीत जास्त ठिकाणी या स्वरुपाची स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न आहे.
- राजश्री नवले, अध्यक्षा, महिला व बालकल्याण समिती

Web Title: There is no awareness among women about her toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला