पुणे विभागात एकही चारा छावणी नाही; बाधित पशुधन ९५ हजार ६७९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 07:20 PM2019-03-28T19:20:22+5:302019-03-28T19:22:06+5:30
पावसाने पाठ फिरवल्याने पुणे विभागातील सातारा, सांगली,सोलापूर व पुणे जिल्ह्यात पाणी व चा-याचा कमी अधिक प्रमाणात तुटवडा आहे.
पुणे : पुणे विभागात सांगली व सातारा दोन जिल्ह्यातच दुष्काळाने बाधित झालेल्या पशुधनाची संख्या गुरूवारी (दि.२८) ९५ हजार ६७९ वर गेली आहे. मात्र,अद्याप एकाही ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून अनुदानित चारा छावणी सुरू करण्यात आलेली नाही. अखेर काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेवून लहान मोठ्या जनावरांसाठी दोन छावण्या सुरू केल्या आहेत.
पावसाने पाठ फिरवल्याने पुणे विभागातील सातारा, सांगली,सोलापूर व पुणे जिल्ह्यात पाणी व चा-याचा कमी अधिक प्रमाणात तुटवडा आहे. त्यातच उन्हाचा तडाखा बसण्यास सुरूवात झाल्याने दुष्काळाची तीव्रता चांगलीच जाणवू लागली आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यात ५१ हजार ८४३ आणि सांगली जिल्ह्यात ४३ हजार ८३६ जनावरे दुष्काळाने बाधित झाली आहेत. या दोन जिल्ह्यातील दुष्काळ बाधित जनावरांची संख्या ९५ हजार ६७९ असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुढील आठवड्यात बाधित जनावरांचा आकडा १ लाखावर गेलेला दिसून येईल, असे अधिका-यांकडून सांगितले जात आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयातील पुरवठा विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, साता-यात व सांगली जिल्ह्यात एकही अनुदानित चारा छावणी सुरू झालेली नाही. मात्र, माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून माण तालुक्यात म्हसवड येथे एक चारा छावणी सुरू आहे.त्यात ८ हजार १०९ तर लहान १ हजार ७९८ अशी एकूण ९ हजार ९०७ जनावरे आहेत. तर सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात संत सयाची बागडे महाराज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सुरू केलेल्या चारा छावणीत मोठे ४४ व लहान २० अशी एकूण ६४ जनावरे आहेत. दुष्काळाने बाधित झालेल्या जनावरांची संख्यांचा विचार करता एकही अनुदानित चारा छावणी सुरू झालेली नाही.चारा छावणी सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्यात आलेले आहेत.मात्र,जिल्हा प्रशासनाकडून छावणी सुरू करण्याबाबत सकारात्मकता दाखवली जात नसल्याचे दिसून येत आहे.
----------
दुष्काळ बाधित जनावरांची जिल्हा व तालुका निहाय संख्या :
सातारा जिल्हा : माण- २९,०६३ खटाव १४,४४७, खंडाळा- १२८, फलटण- १,५७३, वाई- ६,३९७, पाटण-२३५,
सांगली: खानापूर ५,८४७, आटपाडी -३७,९८६
-----------------------