कपडे आणि बीभत्सपणाचा संबंध नाही
By admin | Published: December 20, 2014 11:21 PM2014-12-20T23:21:53+5:302014-12-20T23:21:53+5:30
तुम्ही कसे कपडे घातले आहेत किंवा कपडे घातलेच नाहीत, याचा बीभत्सपणाशी संबंध नाही. पूर्ण कपडे घालूनही बीभत्सपणे मी वागू शकतो. आपण जन्माला येतो,
आमिर खानचे उद्गार : पोस्टरसाठी खास फोटो शूट नाही, तो फोटो चित्रपटातील एक क्षण
मुंबई : तुम्ही कसे कपडे घातले आहेत किंवा कपडे घातलेच नाहीत, याचा बीभत्सपणाशी संबंध नाही. पूर्ण कपडे घालूनही बीभत्सपणे मी वागू शकतो. आपण जन्माला येतो, तेव्हा कपड्यांशिवायच येतो. नंतर आपल्याला कपडे घालण्याची सवय लागते, असे सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने सांगितले.
‘पीके’या आमिर खानच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने ‘लोकमत’तर्फे एका खास कार्यक्रमाचे आयोजन वांद्रे येथील ताज लँड एण्ड्समध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमिर खान, अभिनेत्री अनुष्का शर्मा, दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि निर्माता विधू विनोद चोप्रा हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात ‘पीके’च्या पोस्टरविषयी अभिनेता आमिर खान यांनी बोलणे टाळले. पण, त्याच वेळी आमिर म्हणाला, की पोस्टरची संकल्पना म्हणून हे वेगळे फोटो शूट केलेले नाही. पोस्टरवरचा फोटो हा चित्रपटातील एक क्षण आहे; पण तरीही हा चित्रपट सगळ्या कुटुंबाबरोबर तुम्ही पाहू शकता. कारण चित्रपटात हे इतक्या सहजनेते आले आहे, की त्यात मला वेगळे असे काहीच वाटले नाही. पण, कपडे घातले पाहिजेत, असे आपल्या मनावर ठसवले जाते, त्यामुळेच आपण असा विचार करायला लागतो.
विधू विनोद चोप्रा यांना २००-३०० कोटींच्या क्लबविषयी तुमचे काय म्हणणे आहे, असे विचारले असता त्यांनी सांगितले, की कोटींचा क्लब अशा कोणत्याही गोष्टीचा मी कधीच विचार करीत नाही. चित्रपट चांगला असला पाहिजे, हे आम्हाला महत्त्वाचे असून, मी त्याचाच विचार करतो. चित्रपट चांगला बनणे गरजेचे आहे़ चित्रपटाने १ कोटी कमावले किंवा १ हजार कोटी कमावले, याचा विचार आम्ही करीत नाही, असे चोप्रा यांनी सांगितले.
‘पीके’ चित्रपटात मी एका पत्रकाराच्या भूमिकेत आहे. मी एक चांगली पत्रकार आहे, इतकेच माझ्या भूमिकेविषयी सांगेन. चित्रपट येण्याआधीच माझा लुक आवडल्याचे कळले असल्यामुळे मला याचा आनंद आहे, असे अनुष्का शर्माने सांगितले.
तुमच्या चित्रपटांतील व्यक्तिरेखा तुम्हाला भेटतात कुठे, असा प्रश्न विचारल्यावर, ‘खरे सांगायचे तर या व्यक्ती आपल्याला प्रत्येकाला आयुष्यात भेटतात. कथा लिहिताना व्यक्तिरेखांवर अधिक काम केले जाते,’ असे राजकुमार यांनी सांगितले. या सगळ््यांना ‘लोकमत’च्या फीचर एडिटर अर्पणा वेलणकर यांनी बोलते केले. (प्रतिनिधी)
राजकुमार हिरानींनी ‘लगे रहो मुन्नाभाई’नंतर ‘पीके’च्या कथेवर काम सुरू केले होते. मात्र, कथेचा पहिला भाग लिहून झाल्यानंतर त्यांनी ‘थ्री इडियट्स’वर काम सुरू केले. ‘थ्री इडियट्स’ दरम्यान हिरानी यांनी आमिरला ‘पीके’च्या कथेविषयी सांगितले. तो चित्रपट पूर्ण झाल्यानंतर आमिरने काही महिन्यांनी हिरानींना ‘पीके’ची कथा ऐकायला बोलावले. कथा ऐकून अवघ्या दोन तासांत त्याने चित्रपटात काम करण्यास होकारही दिला.
अभिनेत्री म्हणून अनुष्का शर्मा ही पहिली निवड नव्हती. त्याआधी दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांची नावे आघाडीवर होती. आमिरलाही दीपिकाने चित्रपटात काम करावे, असे मनापासून वाटत होते; पण दीपिका तेव्हा तीन चित्रपट करीत होती. त्यामुळे साहजिकच तिच्याजवळ वेळ नव्हता. कतरिनाबरोबर हिरानींचे ट्युनिंग जमले नाही. कोणती अभिनेत्री घ्यायची, याचा शोध सुरू असताना आदित्य चोपडाने अनुष्का शर्माचे नाव सुचवले.
अनुष्काने याआधी हिरानींबरोबर काम करण्यासाठी प्रयत्न केले होते. आपण ‘थ्री इडियट्स’साठी आॅडिशन दिली होती, असे अनुष्काने सांगितले होते. या आॅडिशनदरम्यान ‘मुन्नाभाई’ चित्रपटातला एक सीन करण्यास दिला होता. त्यात अनुष्काच्या अत्यंत वाईट अभिनयामुळे तिला लगेच ‘तू जाऊ शकतेस’ असे सांगण्यात आले होते.
अनुष्काने ‘पीके’ चित्रपटात बाईकही चालवली आहे. त्यादरम्यान ती बाईकवरून पडल्याने जखमी झाली होती. पण जिद्दीने प्रयत्न करून अवघ्या ४ दिवसांत ती बाईक चालवायला शिकली. ज्या बाईकवर अनुष्काचे सीन्स चित्रित झाले, तीच बाईक युनिटने तिला गिफ्ट म्हणून दिली, असे सांगितले जाते.