अविवाहित तरुण-तरुणींमध्ये लैंगिक संबंधांदरम्यान ‘निरोध’ वापरण्याबाबत सातत्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:21 AM2021-02-28T04:21:35+5:302021-02-28T04:21:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संततिनियमनासाठी लैंगिक संबंधांदरम्यान ‘निरोध’चा अधिकाधिक वापर करणे हा एक मार्ग आहे. परंतु हे ...

There is no consistency in the use of ‘condoms’ during sexual intercourse among unmarried adolescents | अविवाहित तरुण-तरुणींमध्ये लैंगिक संबंधांदरम्यान ‘निरोध’ वापरण्याबाबत सातत्य नाही

अविवाहित तरुण-तरुणींमध्ये लैंगिक संबंधांदरम्यान ‘निरोध’ वापरण्याबाबत सातत्य नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : संततिनियमनासाठी लैंगिक संबंधांदरम्यान ‘निरोध’चा अधिकाधिक वापर करणे हा एक मार्ग आहे. परंतु हे माहिती असूनही अविवाहित तरुण-तरुणींमध्ये लैंगिक संबंधांवेळी ‘निरोध’चा वापर करण्याबाबत सातत्य नसल्याचे एका संशोधनात्मक अभ्यासातून समोर आले आहे. कधीतरी भेटणं, कोणतेही नियोजन केलेले नसताना जवळ येणं किंवा मेडिकलच्या दुकान जाऊन निरोध मागण्याची लाज वाटणं, ही त्यामागची कारणे आहेत. यामध्ये काही तरुणींनी अनैच्छिक गर्भधारणेचा धोकादेखील पत्करला असल्याची बाब पाहायला मिळत आहे.

प्रयास आरोग्य ग्रुपतर्फे ‘यूथ इन ट्रांझिशन’ शीर्षकांतर्गत साधारणपणे २0 ते २९ वर्षे वयोगटातील १२४० अविवाहित तरुण-तरुणींशी संवाद साधून संशोधनात्मक अभ्यास करण्यात येत आहे. यामध्ये ६५३ तरुण, ५८४ तरुणी आणि ३ ‘इतर’ यांचा समावेश आहे. रितू परचुरे, डॉ. श्रीनिवास दरक, तृप्ती दरक आणि डॉ. विनय कुलकर्णी यांनी हे सर्वेक्षण केले आहे. सध्याचे वाढते शहरीकरण, संगणकीकरणाचा वाढता वापर याचा त्यांच्या जीवन, नातेसंबंध किंवा लैंगिक वर्तनावर काही परिणाम झाला आहे का, हा या संशोधनामागील उद्देश आहे. यामध्ये सहा विविध विषयांवर अहवाल प्रसिद्ध केले जाणार आहेत. नुकताच संस्थेने अविवाहित तरुण-तरुणींमध्ये ‘गर्भनिरोधकाचा वापर आणि अनैच्छिक गर्भधारणा’ या विषयावरील एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालामधील निरीक्षणात्मक नोंदीनुसार ९0 टक्के तरुण-तरुणींना निरोधबाबत आणि तो का वापरायचा याबाबतची माहिती आहे. मात्र त्यांच्यामधील ४७ टक्के लैंगिक संबंधांमध्ये निरोध वापरण्याबाबत सातत्य नसल्याचे दिसून आले आहे.

-------------------------------

अहवालातील निष्कर्ष

* ७३७ नातेसंबंधांपैकी ३४८ जणांच्या (४७ टक्के) लैंगिक संबंधांमध्ये निरोधच्या वापरामध्ये सातत्य नाही.

*३४ टक्के संबंधांमध्ये तातडीच्या गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर

* २0 टक्के तरुण-तरुणींच्या मते जर अनैच्छिक गर्भधारणा टाळायची असेल तर तातडीने उपाययोजना केल्यास गर्भधारणेचा कोणताही धोका नाही.

*३५ टक्के तरुणी आणि १0 टक्के तरुणांना मेडिकलच्या दुकानात जाऊन निरोध तर २७ टक्के तरुण आणि २६ टक्के तरुणींना गर्भनिरोधक गोळ्या मागण्याची लाज वाटते.

*२३८ महिलांमधील ५ टक्के महिलांना गर्भधारणा तर २0९ पुरुषांपैकी ५ टक्के पुरुषांची त्यांच्या जोडीदाराला गर्भधारणा झाल्याची कबुली.

* अनेकांना आईवडिलांशी मोकळेपणाने बोलता येत नाही. लैंगिकतेविषयी कुणाशी बोलायला हवं हेच कळत नाही. त्यासाठी आसपास पोषक वातावरण नाही.

---------------------------------------------

काय व्हायला हवं?

* अविवाहित तरुण-तरुणींमध्ये लैंगिक संबंधांमधील माहितीच्या पलीकडे देखील प्रबोधन करण्याची गरज आहे.

* त्यांच्यातील निर्णयक्षमता वाढून सहकार्यात्मक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे.

--------------------------------------------

प्रयास आरोग्य ग्रुप हा गेली २५ वर्षे एचआयव्ही, तरुणांचे लैंगिक आरोग्य यावर काम करीत आहे. आमच्या क्लिनिकमध्ये राज्यभरातून एचआयव्ही आणि लिंग सांसर्गिक आजार असलेले तरुण येतात. त्यांच्यामध्ये हे आजार वाढत आहेत का? तसेच गेल्या दहा वर्षांत लैंगिक नातेसंबंधांत काही बदल होताहेत का? त्यांना आयुष्यात काही अडचणी आहेत का? त्यांची निर्णयक्षमता कशी आहे. हे शोधण्याचा हा प्रयत्न आहे. भारतातील अशा पद्धतीने हा पहिलाच सखोल अभ्यास होत आहे.

- डाॅ. श्रीनिवास दरक, प्रयास आरोग्य ग्रुप

---------------------------------------------

Web Title: There is no consistency in the use of ‘condoms’ during sexual intercourse among unmarried adolescents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.