पुण्यातील प्रभात रस्त्याची लागली ‘वाट’, ठेकेदारांवर नियंत्रणच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 01:37 AM2019-04-03T01:37:39+5:302019-04-03T01:38:09+5:30
महापालिकेत समन्वयाचा अभाव : ठेकेदारांवर अभियंत्यांचे नियंत्रणच नाही
पुणे : वर्षभरापूर्वीच काही लाख रुपये खर्च करून काळा कुळकुळीत व गुळगुळीतही केलेल्या प्रभात रस्त्याची फक्त दोन ते तीन आठवड्यांतच वेगवेगळ्या कामांनी वाट लागली आहे. एकाच वेळी महापालिकेची तीन कामे या रस्त्यावर सुरू असून, त्यात त्यांनी चांगल्या डांबरीकरणाचा हा रस्ता खडीकरणाचा करून टाकला आहे.
लॉ कॉलेज रस्त्यावरून सुरू होऊन थेट डेक्कनपर्यंत हा रस्ता जातो. साधारण वर्षभरापूर्वीच त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी रस्त्याची एक बाजू खोदण्यात आली. पदपथ तयार करायचा आहे, असे त्या वेळी सांगण्यात आले. ते काम सुरू झाले. त्यानंतर लगेचच रस्त्याची दुसरी बाजू खोदायला सुरुवात झाली. तिथे ड्रेनेजलाईन टाकायची अशी माहिती मिळाली. तेही काम सुरू झाले. आता ही दोन्ही कामे सुरू असतानाच रस्त्याचेच काही काम तिथे सुरू करण्यात आले आहे.
पदपथाच्या कामाची खडी, फरशा व अन्य साहित्य रस्त्याच्या मध्ये येणार नाही या पद्धतीने ठेवण्याची जबाबदारीही ठेकेदाराचीच आहे. मात्र, ठेकेदाराचे कामगार रस्त्याच्या मध्येच सर्व साहित्य ठेवतात व काम करत राहतात. त्यामुळे वाहनधारकांची अडचण होते. ती होऊ नये अशा पद्धतीने ठेकेदाराने काम करणे अपेक्षित आहे.
ठेकेदारांच्या कामावर कोणाचेच नियंत्रण नसते. तिथे पालिकेच्या पथ विभाग, बांधकाम विभाग, ड्रेनेज विभाग किंवा ज्या विभागाचे काम सुरू आहे त्या विभागाच्या अभियंत्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे असते. मात्र तेही होताना दिसत नाही. अभियंते काम सुरू असते, त्या ठिकाणी फिरकतही नाहीत. खात्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे शहरात बहुसंख्य ठिकाणी याच पद्धतीने चांगल्या रस्त्यांची वाट लावली जात आहे. केबल टाकणाऱ्या कंपन्यांकडूनही रस्त्यांची अशीच बेसुमार खोदाई केली जात आहे. त्यांचे ठेकेदारही रस्ता खोदला की तो नीट बूजवत नाहीत. चांगले डांबरी रस्तेही खोदून खराब केले जातात व त्यानंतर पुन्हा त्यावर
डांबरीकरणाचे काम प्रस्तावित केले जाते.
एकाच वेळी तीन-तीन कामे सुरू
४एकाच वेळी सुरू असलेल्या या तीन-तीन कामांनी रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे. ठेकेदार त्यांच्या मर्जीला वाटेल तसेच काम करत आहेत.
४ड्रेनेजचे पाइप बरेच मोठे आहेत. ते रस्त्यात टाकताना रस्ता जवळपास मध्यापर्यंत खोदण्यात आला. पाइप टाकून झाल्यावर खड्डा बुजवण्याची जबाबदारी ठेकेदाराचीच आहे. ते काम नीट न करता फक्त माती टाकून दिली जाते. ती खचते व डांबरी रस्ता व हा खड्डा खोदून बुजवलेला रस्ता खालीवर होतो. त्यात दुचाकी अडकतात व पडतात.
प्रभात रस्त्यावर या पद्धतीने काम सुरू आहे हे खरे आहे. एकाच वेळी अशी तीन कामे शक्यतो होत नाहीत, तिथे झाली आहेत. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो हेही खरे आहे. पथ विभागाच्या वतीने ठेकेदारांना समज देऊन नागरिकांना त्रास होणार नाही या पद्धतीने काम करण्यास सांगण्यात येईल. काम झालेल्या ठिकाणी खड्डा नीट बुजवण्याची काळजीही घेतली जाईल.
- अनिरुद्ध पावसकर,
प्रभारी अधीक्षक अभियंता, पथ विभाग, महापालिका