पुणे जिल्ह्यात एकही काेराेनाचा रुग्ण नाही ; अफवांवर विश्वास ठेवून नका : जिल्हाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 07:48 PM2020-03-04T19:48:52+5:302020-03-04T19:49:49+5:30
पुण्यात काेराेनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात 'कोरोना'चा एकही संशयीत रुग्ण नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, 'कोरोना' व्हायरस बाबत सोशल मीडियावर अफवा पसरविल्या जात आहे, त्यावर विश्वास ठेवू नये. इतर संसर्गजन्य रोगाच्या बाबतीत आपण जी काळजी घेतो, तशीच खबरदारी सर्वांनी घ्यावी. साबणाने हात धुणे, मास्क वापरणे याबाबत दक्षता घ्यावी. शिंकणे, खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या वाटे या विषाणूचा प्रसार होतो. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक शिष्टाचार पाळणे आवश्यक असून खोकतांना, शिंकताना नाका तोंडावर रुमाल ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. खोकला किंवा तत्सम आजार झाल्यास तात्काळ वैद्यकीय तपासणी करून उपचार करून घ्यावे.
भविष्यात राज्यात किंवा पुणे जिल्ह्यात 'कोरोना'चा उद्रेक झाला तरी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा 'कोरोना' उपचारासाठी दक्ष असून नागरिकांनी भीती बाळगू नये, असे जिल्हाधिकारी श्री नवल किशोर राम यांनी आवाहन केले आहे