'बेफिकीरी' शब्दप्रयाेगाने संभाजी महाराजांचा अपमान हाेत नाही; सुबाेध भावेंचे वादावर स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 06:37 PM2018-10-25T18:37:59+5:302018-10-25T19:50:59+5:30
'अाणि डाॅ. काशीनाथ घाणेकर' या चित्रपटातील वादावार बाेलताना बेफिकीरी हा शब्दप्रयाेग वेगळ्या अर्थाने केला असल्याचे स्पष्टीकरण अभिनेता सुबाेध भावे याने दिले.
पुणे : बेफिकीरी हा शब्दप्रयाेग सिनेमामध्ये वेगळ्या अर्थाने वापरण्यात अाला अाहे. या शब्दामुळे संभाजी महाराजांचा अपमान हाेत नसल्याचा खुलासा अभिनेता सुबाेध भावे याने केला अाहे. सुबाेध भावे यांची प्रमुख भूमिका असलेला 'अाणि डाॅ. काशीनाथ घाणेकर' हा चित्रपट 8 नाेव्हेंबर राेजी प्रदर्शित हाेणार अाहे. या चित्रपटात "ही बेफिकीरी हाच तुमचा संभाजी..." असा उल्लेख आहे." यावर संभाजी ब्रिगेडने अाक्षेप घेतला हाेता. तसेच या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली हाेती.
भावे म्हणाले, बेफिकीरी हा शब्दप्रयाेग चित्रपटामध्ये वेगळ्या अर्थाने वापरण्यात अाला अाहे. संभाजी महाराजांनी आजूबाजूला असणा-या शत्रुंची फिकीर केली नाही, कुठल्या मोठ्या संकटात सापडले तरी याची फिकीर केली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर सर्वांना एकत्र घेऊन पुढचे काही वर्षे ते औरंगजेब आणि इतरांशी बेधडकपणे झुंझत राहिले आणि इतरांनाही लढायला शिकवले. आणि त्याला अनुसरूनच बेफिकीरी हा शब्दप्रयोग चित्रपटात करण्यात आला आहे. या शब्दातून संभाजी महाराजांचं लढवय्येपण आपल्या डोळ्यासमोर येतं. यामुळे त्यांचा अपमान होतो असे मला वाटत नाही.
पुढे बाेलताना भावे म्हणाले, हा चित्रपट संभाजी महाराजांवर नसून डाॅ. काशिनाथ घाणेकर यांच्यावर अाधारीत अाहे. त्यांनी साकारलेल्या विविध भूमिकांवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात अाला अाहे. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातील काही प्रसंग या चित्रपटात अाहेत. ते प्रसंग चित्रपटात का अाहेत. हे चित्रपट पाहिल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे चित्रपट न पाहताच कुणाच्या मनात काही गैरसमज असतील तर ते काढून टाका. शिवाजी महाराज अाणि संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत अाहेत. त्यांचा अपमान करणे किंवा त्यांना कमी लेखने असे कुठल्याही कृत्यात अामची टीम सहभागी हाेणार नाही.