‘सीईटी’ होत नाही तोपर्यंत अकरावी प्रवेश नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:08 AM2021-07-23T04:08:21+5:302021-07-23T04:08:21+5:30
पुणे : अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटी’ आवश्यक आहे. त्यामुळे जोपर्यंत ‘सीईटी’ प्रक्रिया पार पडत नाही, तोपर्यंत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाला अकरावी ...
पुणे : अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटी’ आवश्यक आहे. त्यामुळे जोपर्यंत ‘सीईटी’ प्रक्रिया पार पडत नाही, तोपर्यंत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाला अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिले आहेत. त्यामुळे ‘सीईटी’ होण्यापूर्वी कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाला अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘सीईटी’ची कार्यवाही पूर्ण होत नाही, तोपर्यंत अकरावीमध्ये प्रवेश देता येणार नाही आणि कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रिया सुरू करता येणार नाही. ‘सीईटी’नंतर राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत कार्यपद्धतीने स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. मात्र, तोपर्यंत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांना अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करता येणार नाही, याकडे माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी लक्ष वेधले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची लेखी परीक्षा रद्द केली आहे. त्यानंतर सुधारित मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला आहे. त्याचदरम्यान राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठी संपूर्ण एक सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) लागू केलेली आहे. अकरावी ‘सीईटी’ची कार्यवाही सुरू असताना काही महाविद्यालये प्रवेश प्रक्रिया राबवित असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. एकीकडे ‘सीईटी’ची प्रक्रिया सुरू आहे, तर दुसरीकडे परस्पर काही महाविद्यालये प्रवेश प्रक्रिया राबवित आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा गोंधळ उडाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने काढलेले परिपत्रक महत्त्वाचे आहे.
-----
कोट
‘सीईटी’ विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक आहे. अकरावी प्रवेश करताना ‘सीईटी’ दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतर उर्वरित जागांवर इतर विद्यार्थ्यांना दहावी मूल्यमापन पद्धतीनुसार प्राप्त गुणांच्या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत.
- दिनकर टेमकर, शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र