पुण्याचे जादा पाणी अळवावरचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 03:25 AM2018-03-30T03:25:31+5:302018-03-30T03:25:31+5:30

पुण्याच्या पाण्यावरून पुण्याबाहेरच्याच नाही तर स्वत:ला अस्सल पुणेकर म्हणवून घेणाऱ्या पालकमंत्र्यांकडूनही टीका होत आहे.

There is no excess water in Pune | पुण्याचे जादा पाणी अळवावरचेच

पुण्याचे जादा पाणी अळवावरचेच

Next

युगंधर ताजणे  
पुणे : पुण्याच्या पाण्यावरून पुण्याबाहेरच्याच नाही तर स्वत:ला अस्सल पुणेकर म्हणवून घेणाऱ्या पालकमंत्र्यांकडूनही टीका होत आहे. पुणेकरांना जास्त पाणी लागते असे म्हणणाºया या सर्वांना हे जास्तीचे पाणी अळवावरचे म्हणजे न टिकणारे आहे हे लक्षातच येत नाही असेच एकूण आकडेवारीमधून दिसत आहे. ५० टक्के गळतीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असून, त्यावर दरवर्षी शेकडो कोटी रुपये खर्च होत आहेत, तरीही पाणी मात्र मिळतच नाही अशी पुण्याच्या पाण्याची अवस्था आहे.
पुण्याची सर्वसाधारण लोकसंख्या ४० लाख आहे. खडकवासला धरणातून पुणेकरांसाठी दररोज १३५० दशलक्ष लिटर पाणी घेण्याची मंजुरी आहे. ४० लाख भागिले १३६० केले तर साधारण माणशी ३०० लिटर मिळते. शास्त्रीय मानकानुसार प्रत्येक व्यक्तीला त्याची अंघोळ व इतर गरजा लक्षात घेऊन १५० लिटर पाणी मिळणे अपेक्षित आहे. या उत्तराचा अर्थ शास्त्रीय मानकानुसार महापालिका प्रत्येक पुणेकराला रोज ३०० लिटर म्हणजे दुप्पट पाणी देते असेच दिसते. आता पाटबंधारे खात्याच्या म्हणण्यानुसार तर महापालिका गेली काही वर्षे रोज १६५० दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणी धरणातून घेत आहे. ४० लाख भागिले १६५० याचे उत्तर प्रत्येक पुणेकराला महापालिका ४१० लिटर म्हणजे मानकापेक्षाही दुप्पटच नाही तर त्यापेक्षाही जास्त पाणी देते असेच दिसते. मात्र हे पाणी अळवावरचे आहे असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील सर्वच अधिकाºयांचे मत आहे.
महापालिकेच्या शहरातंर्गत पाणी वितरणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गळती आहे. ती किती आहे तर तब्बल ५० टक्के आहे. याचा अर्थ धरणातून १३५० किंवा १६५० दशलक्ष लिटर पाणी उचलले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र पुणेकरांना दररोज फक्त ६७५ किंवा ८२५ दशलक्ष लिटर पाणी मिळते. या प्रत्यक्ष मिळणाºया पाण्याचे ४० लाख लोकसंख्येबरोबरचे प्रमाण माणशी १५० लिटर किंवा २०० लिटर इतके आहे. पण हे मिळणारे सगळे पाणी फक्त पुणेकरांनाच मिळत असेल तरच आहे. प्रत्यक्षात मात्र महापालिकेला आसपासच्या गावांना पाणी द्यावे लागते. त्यासाठी दररोज ३ ते ४ दशलक्ष लिटर पाणी लागते. त्यानंतर ज्या भागांना पाणी मिळत नाही, त्या भागासाठी टँकर पुरवावे लागतात. त्यासाठी किमान १ दशलक्ष लिटर पाणी लागते. उन्हाळ्यात या प्रमाणात वाढही होते. त्यामुळेच दिसायला पाणी जास्त घेतले असे दिसत असले तरीही पुणेकरांना पाणी कमी प्रमाणातच मिळते हेच सत्य असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगतात.
गळतीची कारणे सांगताना पाणी पुरवठा विभागातील अधिकाºयांनी स्पष्ट केले, की बहुसंख्य जलवाहिन्या ४० ते ५० वर्षे जुन्या आहेत. त्या बदलणे गरजेचे आहे, मात्र एका ठिकाणी बदलली तर लगेचच दुसºया ठिकाणी गळती सुरू होते. शहरातंर्गत जलवाहिन्यांचे एकूण अंतर १ हजार ८०० किलोमीटर इतके आहे. मुख्य जलवाहिन्या वेगळ्याच आहेत व त्याही जुन्याच आहेत. त्यांनाही गळती आहे. गळती बंद करायची असेल तर संपूर्ण वाहिन्याच बदलणे आवश्यक आहे व समान पाणीपुरवठा योजनेत (२४ तास पाणी योजना) नेमके तेच करण्यात आले असल्याचे महापालिका अधिकाºयांचे म्हणणे आहे. आयुक्त कुणाल कुमार यांनीही तसाच दावा केला आहे.
आता धरणातून पाणी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बंद पाईपलाईनने येते. त्यामुळे कालव्यातून मुरणारे व बाष्पीभवनाद्वारे गळती होणारे पाणी बंद झाले आहे. मात्र पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून पुढे जाणारे पाणी अजूनही कालव्यातूनच जाते. त्या वेळी ही गळती होतच असते. तेही प्रमाण फार मोठे नसले तरी दुर्लक्ष करण्यासारखे नाही. याशिवाय धरणातून उचलल्या जाणाºया पाण्याचे मोजमाप हाही वादाचा मुद्दा झाला आहे. इतके पाणी घेतलेच जात नाही असे पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांचे म्हणणे आहे. चुकीच्या पद्धतीने पाणी मोजले जाते. त्यामुळेच पुणेकरांना जास्त पाणी मिळते हे मुळातच चूक आहे असे अधिकारी सांगतात.

शहरात पाण्याचे घरगुती वापराचे व व्यावसायिक असे एकूण दीड लाख अधिकृत नळजोड आहेत. अनधिकृत नळजोडांची संख्या ३ लाख म्हणजे त्याच्या बरोबर दुप्पट आहे. पाणी पुरवठा विभागातीलच ही आकडेवारी आहे. अनधिकृत नळजोडांवर कारवाई केली जाते, दंड वसूल करून ते बंद केले जातात व काही काळाने तेच पुन्हा सुरू होतात किंवा नव्याने अनधिकृतपणे नळजोड घेतला जातो. ते शोधण्यासाठी मोहीम सुरू केली तर दबाव येतो.
पाणीपुरवठा योजनेचे वार्षिक अंदाजपत्रक ४५० कोटी रुपयांचे आहे व पाणीपट्टी वसुली १०० कोटी रुपयांच्या पुढे काही जात नाही. हे १०० कोटी रुपयेही गेल्या काही वर्षांत जमा होऊ लागले आहेत. त्यापूर्वी ५० ते ७० कोटी रुपयेच जमा होत होते. ही तफावत प्रत्येक नळजोडाला मीटर लावल्याशिवाय भरून निघणार नाही. २४ तास पाणी योजनेत तेच करण्यात आले आहे.

गळती बंद होईल
पाण्याची गळती ही पाणीपुरवठा विभागातील सर्वांत गहन समस्या आहे. घेतलेले पाणी जास्त दिसते, मात्र प्रत्यक्षात मिळत असलेले पाणी कमीच आहे. गळती बंद करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात, मात्र ते यशस्वी होत नाहीत. त्यामुळेच समान पाणी योजनेत संपूर्ण जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत व मीटरही बसवले जाणार आहेत.
- व्ही. जी. कुलकर्णी,
अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

पाणी बरोबर मोजले जाते
धरणातून बाहेर पडणारे पाणी मोजले जातेच. बाष्पीभवनाचाही विचार करून पाण्याचा ताळेबंद मांडला जातो. यावरून पाण्याचा हिशेब किती बारकाईने केला जातो हे दिसते. महापालिका धरणातून जास्त पाणी उचलत आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कमी पाणी उचलले जाते हे अयोग्य आहे.
- पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला विभाग

Web Title: There is no excess water in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.