महापालिकेच्या ऑनलाईन सभेत कोणाचा कोणाला मेळ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:19 AM2021-02-18T04:19:54+5:302021-02-18T04:19:54+5:30
पुणे : कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देषाचे पालन करीत महापालिकेने ऑनलाईन सभेचा फार्स घातला असला, तरी ही ऑनलाईन ...
पुणे : कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देषाचे पालन करीत महापालिकेने ऑनलाईन सभेचा फार्स घातला असला, तरी ही ऑनलाईन सभा म्हणजे सावळा गोंधळ ठरू लागली आहे. महापौर दालनात गटनेत्यांच्या चर्चेत विषयाचा अनुक्रम ठरून ते मान्य झाल्यानंतरही अन्य नगरसेवकांना त्यांचा थांगपत्ताही लागत नसल्याने अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे़. दरम्यान, ही ऑनलाईन सभा सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे. या सभेत इतरांपैकी कोणाचा कोणाला मेळ नसल्याने काहीजणांनी या सभेकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे़
महापालिकेची ऑनलाईन सभा महापौरांच्या बैठक कक्षातून नियंत्रित केली जाते. या ठिकाणी महापौरांसह, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्या, सर्व गटनेते यांच्यासह नगरसचिव उपस्थित राहत आहेत़, तर स्थायी समितीच्या सभागृहात महापालिका आयुक्तांसह सर्व अधिकारी उपस्थित राहून या सभेला उत्तरे देत आहेत़. याचबरोबर शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये त्या-त्या भागातील नगरसेवकांनी उपस्थित रहावे व या सभेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आहे़
मात्र या सर्व ऑनलाईन यंत्रणेत कोणाचा कोणाला मेळ लागत नसल्याचे चित्र गेली दोन दिवस दिसत आहे़. महापौर सभागृहात एखादा विषय पुकारला जातो व तो तेथे मान्यही होतो, तोपर्यंत इतरांचे ऑनलाईन सिस्टिममधील माईक ऑन/ऑफच्या प्रक्रियेतच अडकले जातात़. त्यातच एकापेक्षा अधिकजण एकाचवेळी बोलले तर आवाज मोठ्या प्रमाणात घुमतो, तर प्रतिध्वनीही मोठ्या प्रमाणात येतो़, यामुळे कोणता विषय पुकारला आहे, त्याला कधी मंजुरी मिळाली, त्यावर प्रशासनाकडून काय खुलासा आला, याची पुसटशी कल्पनाही क्षेत्रीय कार्यालयात बसलेल्या नगरसेवकांना येत नसल्याच्या तक्रारी आहेत़
---
चौकट
ऑनलाईन सभेत महापौर कार्यालयात गटनेते चर्चा करतात व त्यांच्यातील चर्चा बाहेर कळू नये, म्हणून तेथील माईक बंद करतात़ , मुळे महापालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा पारदर्शकपणे होत नाही़. नागरिकांचे म्हणणे जे नगरसेवक सभेत मांडू इच्छितात, त्यांना या ऑनलाईन सभेमुळे वाव मिळत नाही़. एखादा विषय विनाचर्चा मान्य करायचा असेल, तर सत्ताधारी हा तिथल्या तिथे तो विषय पुकारून मान्य करतात़, असा आरोप माजी उपमहापौर डॉ़. सिध्दार्थ धेंडे यांनी केला आहे़.