एमबीबीएस डाॅक्टर मिळत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांची धुरा बीएएमएस डॉक्टरांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:12 AM2021-03-05T04:12:04+5:302021-03-05T04:12:04+5:30
पुणे : जिल्ह्यात प्रामुख्याने दुर्गम व आदिवासी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आजही डाॅक्टर उपलब्ध नसतात. जिल्ह्यात 99 प्राथमिक आरोग्य ...
पुणे : जिल्ह्यात प्रामुख्याने दुर्गम व आदिवासी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आजही डाॅक्टर उपलब्ध नसतात. जिल्ह्यात 99 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, तब्बल 209 एमबीबीएस डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. यापैकी 199 पदे भरली असून, केवळ 10 पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर डाॅक्टर नियुक्त असले, तरी दुर्गम आणि आदिवासी तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर डाॅक्टरच उपलब्ध होत नाहीत. एकूण रिक्त पदापैकी शहरी भागातील सर्व पदे भरली असून, दुर्गम भागाकडे डाॅक्टर जात नसल्याचे आकडेवाडीवरुन स्पष्ट होते.
शासनाच्या नियमानुसार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. परंतु पुणे जिल्ह्यात एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याने जिल्हा परिषदेच्या वतीने बीएएमएस डॉक्टर नियुक्त केले आहेत.
पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्यात देखील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला एमबीबीएस डॉक्टर मिळत नाहीत. त्यातही जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, वेल्हा, मावळ, मुळशी तालुक्या सारख्या दुर्गम भागाकडे हे डॉक्टर पाठ फिरवतात. तर पुणे शहरालगत असलेल्या हवेली तालुक्यातील शंभर टक्के रिक्त पदे भरली जातात. यावरूनच डॉक्टरांचा ओढा शहरी व विकसीत भागाकडेच राहत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर होत असल्याचे चित्र आहे.
---------
- जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र - 99
- एकूण मंजूर पदे : 209
- भरलेली पदे : 199
- एकूण रिक्त पदे : 10
--------
तालुका प्राथमिक केंद्रे भरलेली पदे रिक्त पदे
खेड 21 19 02
इंदापूर 21 19 02
बारामती 20 19 01
मावळ 11 09 02
मुळशी 09 09 00
शिरूर 13 12 01
हवेली 27 27 00
भोर 12 12 00
पुरंदर 11 10 01
दौंड 17 16 01
वेल्हा 05 05 00
जुन्नर 24 24 00
आंबेगाव 16 16 00
एकूण 209 199 10
-----
पगार आणि काँट्रॅक्टमुळे एमबीबीएस डॉक्टर मिळताना अडचण
शासनाच्या वतीने एमबीबीएस डॉक्टरांना देण्यात येणार पगार तुलनेत कमी असल्याने व ही सर्व पदे काँट्रॅक्ट बेसीसवर भरली जातात. यामुळेच अनेक एमबीबीएस डॉक्टर जिल्हा परिषदेच्या सेवेत येण्यास तयार नसतात. त्यात दुर्गम भागात जाण्यास देखील टाळाटाळ करतात. परंतु जिल्ह्यात 97 टक्के पदे भरली असून, एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टर नियुक्त केले आहेत.
डाॅ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी
-----