कोरोनावर औषध नाही; लसीकरण ‘फास्ट ट्रॅक’ वर आणण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:13 AM2021-02-25T04:13:20+5:302021-02-25T04:13:20+5:30

पुणे : सध्या लसीकरणाच्या प्रक्रियेचा वेग अ‍ॅपवरील नोंदणी, दररोज १०० जणांनाच लस, मेसेज न येणे, नावे गायब होणे या ...

There is no medicine on the corona; Vaccination needs to be brought on 'fast track' | कोरोनावर औषध नाही; लसीकरण ‘फास्ट ट्रॅक’ वर आणण्याची गरज

कोरोनावर औषध नाही; लसीकरण ‘फास्ट ट्रॅक’ वर आणण्याची गरज

Next

पुणे : सध्या लसीकरणाच्या प्रक्रियेचा वेग अ‍ॅपवरील नोंदणी, दररोज १०० जणांनाच लस, मेसेज न येणे, नावे गायब होणे या चक्रात अडकल्याने मंदावला आहे. पुणे जिल्ह्यात दररोज सरासरी ५३ टक्केच लसीकरण होत आहे. ईस्त्राईलमध्ये दीड कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत २५ टक्के लसीकरण झाले असून, त्या तुलनेत भारतातील लसीकरणाचा वेग केवळ ०.८ टक्के आहे. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी आता त्रुटींवर मात करत ‘मास’ लसीकरणावर भर देण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक पुन्हा एकदा राज्यात अनुभवायला मिळत आहे. शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकरा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही अद्याप कोरोनावरील औषध आपल्या हातात नाही. त्यामुळे लसीकरण हा सध्याचा एकमेव मार्ग आहे. सध्या आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु आहे. मात्र, लसीकरणाचा वेग अत्यंत संथ आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेप्रमाणे योग्य नियोजन करुन लसीकरण प्रत्येकापर्यंत पोहोचावे, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी ‘लोकमत’ला सांगितले.

मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र देशमुख म्हणाले, ‘सध्याच्या लसींना आपत्कालीन परवानगी मिळाली आहे. मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा पूर्ण झालेला नसल्यामुळे लस घेण्याबाबत संभ्रम होता. त्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह झले होते. लसीकरणाला सुरुवात होऊन एक महिना झाला, हाच तिसरा टप्पा आहे. यात कोणतेही गंभीर परिणाम दिसून आलेले नाहीत. लस सर्वांनी घेतल्याने कुटुंबियांना, समाजाला आणि देशाला फायदा होणार आहे. लस न घेतल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लसीची परिणामकारकता ७५ टक्के असल्याचे सिध्द झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, ५० टक्कयांहून अधिक परिणामकारकता असलेली कोणतीही लस सुरक्षित असते. त्यामुळे लस घेण्याबाबत सामान्यांनी मनातील सर्व संभ्रम दूर करावेत आणि राष्ट्रीय कर्तव्यासाठी सज्ज व्हावे.’

शास्त्रज्ञ डॉ. नानासो थोरात म्हणाले, ‘लसीकरणाबाबत भारतात संभ्रम पहायला मिळत आहेत. लस घेतल्यानंतर कोरोना झाल्याची काही उदाहरणे समोर आल्याने आणखीनच भीती वाढली आहे. मात्र, लस घेतल्यानंतर कोरोना झाला तरी रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांनी कमी झाल्याचा निष्कर्ष नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून समोर आला आहे. सध्या लसीकरणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. त्याचप्रमाणे लसीकरणाचा वेग अनेक पटींनी वाढवावा लागणार आहे. गावातील एक-दोन व्यक्तींना लसीकरण करुन भागत नाही. किमान ८०-९० टक्के लोकांचे लसीकरण झाल्यास हर्ड इम्युनिटी निर्माण होऊ शकते आणि मोठा परिणाम दिसून येऊ शकतो.’

---

लसीकरण स्थिती :

विभाग उद्दिष्टआरोग्य कर्मचारीअत्यावश्यक कर्मचारीएकूणलसीकरणाची टक्केवारीआरोग्य कर्मचारी

(पहिला डोस) (लाभार्थी) (पहिला डोस)

पुणे ग्रामीण ४१०० ४७९ ७९७ १२७६ ३१ ५५७

पुणे शहर ३००० ६३८ २२५४ २८९२ ९६ २९३

पिंपरी चिंचवड १६०० १६२ २८४ ४४६ २८ २८९

-----------

एकूण : ८७०० १२७९ ३३३५ ४६१४ ५३ ११३९

-----

विषाणूजन्य आजारांवरील लसींची वस्तूस्थिती :

न्युमोनियाची लस लहान मुलांनी आणि ६० वर्षांवरील व्यक्तींनी घ्यावी, असा नियम आहे. लहान मुलांच्या लसीकरण कार्यक्रमामध्ये न्युमोनियाच्या लसीचा समावेश आहे. त्यामुळे बालकांना लस दिली जाते. मात्र, ६० वर्षावरील व्यक्ती ही लस घेत नाहीत. ज्येष्ठांमध्ये आजारी पडण्याचे मुख्य कारण न्युमोनियाच आहे. न्युमोनियाचे औषध सध्या उपलब्ध आहे. मात्र, कोरोनाचे औषध अद्याप उपलब्ध नाही. म्हणून लस घेणे बंधनकारक आहे. आपल्याकडे एचआयव्हीवर अद्याप लस उपलब्ध नाही. इनफ्लूएन्झासारख्या विषाणूजन्य आजाराची लस दर वर्षी बदलावी लागते, कारण विषाणू स्वरुप बदलतो. ज्ञान आणि तंत्रज्ञान इतके अद्ययावत आहे की दर वर्षी नवीन लस विकसित केली जाते.

Web Title: There is no medicine on the corona; Vaccination needs to be brought on 'fast track'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.