शाळा पाडण्यामागे कुठलाही हेतू नाही - प्रकाश धारिवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 02:36 AM2017-12-02T02:36:21+5:302017-12-02T02:36:35+5:30
नगर परिषदेच्या उर्दू शाळेची इमारत पाडण्याचा नगर परिषदेचा कुठलाही हेतू नसून, त्याबाबत विनाकारण गैरसमज पसरवला जात असल्याचे नगर परिषद सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शिरूर : नगर परिषदेच्या उर्दू शाळेची इमारत पाडण्याचा नगर परिषदेचा कुठलाही हेतू नसून, त्याबाबत विनाकारण गैरसमज पसरवला जात असल्याचे नगर परिषद सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याबाबत आमची भूमिका स्पष्ट असून, मुस्लिम समाजाच्या पदाधिकाºयांनाही अवगत केले असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर परिषद विरोधी पक्ष नेते मंगेश खांडरे यांनी उर्दू शाळा पाडून त्या जागेवर व्यापारी संकुल बांधण्याचा नगर परिषदेचा डाव असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर, धारिवाल यांनी पत्रकार परिषदेत नगर परिषदेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की नगर परिषदेच्या सर्व शाळांना खेळण्यास मैदान आहे. प्रशस्त इमारत व जागा आहे; मात्र उर्दू शाळेची इमारत ही छोटी असून, तिथे मैदानही नाही. इतर सर्व शाळांत ई-लर्निंग आहे; मात्र जागेअभावी उर्दू शाळेत ही सुविधा देता आली नाही. या शाळेला सर्व सुविधा मिळाव्यात, विद्यार्थ्यांना खुल्या वातावरणात शिक्षण घेता यावे, ही नगर परिषदेची पहिल्यापासून भूमिका आहे. २०१४मध्ये ही शाळा नगर परिषदेच्या लाटेआळी येथील बंद इमारतीत स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव नगर परिषदेसमोर आला होता. त्यासाठी नगर परिषदेने ४० ते ५० लाख रुपयांचे इस्टिमेटही तयार केले होते. मात्र, मुस्लिम समाजाने विरोध केल्याने तो विषय त्वरित थांबवला. धारिवाल म्हणाले, उर्दू शाळेची दुरुस्ती अथवा नवीन इमारत बांधण्याविषयी निर्णय हा मुस्लिम समाजाच्या पदाधिकाºयांना विश्वासात घेऊनच घेण्यात येईल. यामुळे उर्दू शाळेची इमारत पाडून तिथे व्यापारी संकुल बांधण्याबाबत होत असलेला आरोप तथ्यहीन असून विनाकारण याबाबत गैरसमज पसरवला जात आहे. नगर परिषदेने नेहमीच सर्वधर्मसमभावाचे राजकारण केले असून, मुस्लिम समाजाच्या विविध समस्यांचे सातत्याने निराकारण केले आहे. शहरातील नगरपरिषदेच्या सर्व शाळांमध्ये उर्दू शाळेचे काम चांगले असून त्यांचे कौतुक केल्याचे धारिवाल यांनी सांगितले. उर्दू शाळेचे स्वच्छतागृह, शेड तसेच विंधन विहिरींचे काम नगरपरिषदेने केले असून, मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमध्ये विकासकामे सुरू असल्याचे स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती मुजफ्फर कुरेशी यांनी सांगितले. मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इकबालभाई सौदागर, उपाध्यक्ष नसीम खान,
सचिव सिकंदर मणियार यांच्या बांधकाम समिती सभापती उज्वला बरमेचा माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, विकास आघाडीचे नेते
संतोष भंडारी सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
गणसंख्येअभावी सभा तहकूब
नगराध्यक्षा वैशाली वाखारे म्हणाल्या, की उर्दू शाळा विकसित करण्याचा विषय सर्वसाधारण सभेसमोर होता; मात्र गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्याने हा विषय पुढे ढकलला गेला. मात्र, ज्या वेळी हा विषय येईल त्या वेळी धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या दृष्टीने योग्य असाच सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे.