यापुढे रस्त्यावर आंदोलन नाही, मराठा क्रांती मोर्चाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 05:38 AM2018-08-11T05:38:57+5:302018-08-11T05:39:13+5:30
क्रांती मोर्चाचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगत यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी सांगण्यात आले.
पुणे : महाराष्ट्र बंदच्या आंदोलनात गैरवर्तन करणारे समाजकंटक असून त्यांचा क्रांती मोर्चाचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगत यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी सांगण्यात आले. १५ आॅगस्ट रोजी घरोघर चूलबंद ठेऊन अन्नत्याग आंदोलन आणि त्यानंतर मागण्या मान्य होईपर्यंत चक्री उपोषण केले जाईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
९ आॅगस्ट रोजीच्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक झाली. चांदणी चौकातही हिंसक वळण लागले. या प्रकारचे गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तींशी आपला संबंध नाही. यामध्ये बाहेरच्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
मराठा क्रांती मोर्चाकडून यापुढील काळातही आंदोलने शांततापूर्ण, अहिंसक व लोकशाही मार्गाने आयोजित केली जाणार आहेत. अन्य कोणत्याही व्यक्तींनी अथवा नेत्यांनी स्वतंत्रपणे कुठलेही आंदोलन करू नये. तसा कोणी प्रयत्न केल्यास त्यांचा आणि मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाचा कोणताही संबंध राहणार नाही ,असे मराठा मोर्चाचे समन्वयक शांतराम कुंजीर, विकास पासलकर, बाळासाहेब अमराळे, सचिन आडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
>तोडफोडीची नुकसानभरपाई देणार
जिल्हाधिकारी कार्यालय येथे गुरुवारी आंदोलन सुरू असताना तिथल्या सुरक्षा रक्षकांच्या केबिनची काच फुटली. याची भरपाई दिली जाणार आहे. त्याचबरोबर काही बाहेरच्या व्यक्तींनी पत्रकार व पोलिसांशी गैरवर्तन केले, त्याबद्दल समन्वयकांनी दिलगिरी व्यक्त केली.
>सीआयडी चौकशी करा : वाळूज एमआयडीसीमधील जवळपास ६० कंपन्यांत झालेली तोडफोड आणि हिंसक घटनांशी आमचा संबंध नाही. त्यामुळे या घटनांचा सीआयडीमार्फत तपास करावा, अशी मागणी मराठा
क्र ांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी औरंगाबाद येथे केली.