Pune Corona Virus: पुण्यात पुर्ण लॅाकडाउनची आवश्यकता नाही - केंद्रीय पथकाचे मत
By प्राची कुलकर्णी | Published: April 11, 2021 07:20 PM2021-04-11T19:20:31+5:302021-04-11T20:05:47+5:30
केंद्र सरकारकडून आलेल्या टीमपैकी पहिल्या टीमचा अहवाल लोकमतच्या हाती
पुणे शहरात पुर्ण लॅाकडाउन ची आवश्यक्ता नसल्याचं मत केंद्रीय पथकाने व्यक्त केलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सादर केलेल्या रिपोर्ट मध्ये हे मत व्यक्त केलं आहे. आत्ताचे निर्बंध परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पुरेसे असल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबरोबरच इतर अनेक सूचनाही यामध्ये करण्यात आल्या आहेत.
वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारच्या पथकाने पुण्यात भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी ही सुचना केली आहे. केंद्र सरकार कडून आलेल्या टीम पैकी पहिल्या टीमचा हा अहवाल आहे. डॅा. जुगल किशोर आणि डॅा. घनःश्याम पांडे यांचा या टीम मध्ये समावेश होता. या अहवालाची प्रत लोकमतच्या हाती लागली आहे.
या अहवालामध्ये सगळ्यात पहिल्याच मुद्द्यामध्ये पुण्यातल्या तीनही यंत्रणा म्हणजे पुणे महापालिका , पिंपरी महापालिका तसेच ग्रामीण यांच्या मध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे म्हणले आहे. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एकच केंद्रीय यंत्रणा किंवा कॅाल सेंटर असावे अशी भुमिका त्यांनी मांडली आहे. पुणे जिल्ह्यासाठी एकच बुलेटिन काढले जावे असंही मत त्यांनी व्यक्त केले आहे. बेड उपलब्धतेचा गोंधळ लक्षात घेता ९५ च्या वर ॲाक्सिजन असणाऱ्या सर्वांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात यावे किंवा ते रुग्णालयात असतील तर त्यांना डिस्चार्ज दिला दावा अशीही सुचना करण्यात आली आहे. याबरोबरच दर दिवशीचे पॅाझिटिव्ह पेशंट पाहुन त्यानुसार नवे बेड तयार ठेवले जावेत असंही केंद्रीय पथकाने म्हणलं आहे.
सीटी स्कॅनचा वापर हा योग्य प्रमाणात केला जावा सरसकट स्कॅनची गरज नसल्याचेही त्यांनी म्हणले आहे. तसेच आवश्यक्ता आहे तेवढीच लसीकरण केंद्र सुरु करावीत असे सांगत केंद्रातुन केल्या जाणाऱ्या लस पुरवठ्याचा प्रश्न सोडवला जावा तसेच जर पुरेशा लस नसेल तर मोठ्या प्रमाणात लसीकरण करु नये अशी सुचना देखील करण्यात आली आहे.
सर्व रुग्णालयांच्या बाहेर माहिती देणाऱया बोर्डाचा अभाव असल्याची नोंद देखील या पथकाने केली आहे. प्रत्येक रुग्णालयाबाहेर दिल्ली प्रमाणे स्क्रीन उभारले जावेत अशी सुचना पथकाकडून करण्यात आली आहे. केंद्रीय वॅार रुमची आवश्यक्ता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. महत्वाचे म्हणजे केंद्रीय पथकाने आत्ताचे निर्बंध पुरेसे असुन पुर्ण लॅाकडाउनची आवश्यकता नसल्याचे म्हणले आहे.