नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचे वाजले तीन तेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:59+5:302021-07-04T04:07:59+5:30
पुरंदर तालुका तसा दुर्गम भागातच मोडतो. या तालुक्यातील अनेक भाग असे आहेत की, तिथे आजही मोबाईल रेंज नाही. ...
पुरंदर तालुका तसा दुर्गम भागातच मोडतो. या तालुक्यातील अनेक भाग असे आहेत की, तिथे आजही मोबाईल रेंज नाही. एवढेच काय तर पुरंदरमधील काळदरी खोऱ्यात तर पोलिसांची बिनतरी संदेश यंत्रणासुद्धा काम करीत नाही. लॉकडाऊनमुळे रोजगार बुडालेल्या पालकांनी उसनवार करून स्मार्टफोन घेतले आहेत. मात्र तालुक्यातील अनेक गावातून आजही मोबाईल रेंज नसल्याने या मोबाईलचा उपयोग होत नाही. अखेर पालकांना मुलांना घेऊन डोंगरच्या उंचावर जाऊन क्लास अटेंड करावा लागत आहे.
सैनिकांचे पिंगोरी गावालाही बारामती खासदार सुप्रिया सुळे यांनी मोबाईल टाॅवर उभा करण्याचे आश्वासन दिले होते. आमदार संजय जगताप यांनीही दोन महिन्यांत माझ्या मामाच्या गावात मोबाईल टॉवर सुरू करतो, अशी घोषणा केली होती. पण आता याला दीड वर्ष होत आली तरी या भागात मोबाईल सेवा सुरू झाली नाही. ज्या लोकांची ऐपत आहे असे लोक खासगी इंटरनेट कनेक्शन घेतात. मात्र ज्यांना दोन वेळचे जेवणाचे पंचायत अशा लोकांना मात्र आपल्या मुलांना उंच डोंगरावर अभ्यासासाठी पाठवावे लागते. या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याने या मुलांना जीव मुठीत धरून रानावनांत अभ्यास करावा लागत असल्याचे मत ‘लोकमत’शी बोलताना पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे यांनी व्यक्त केले.
पिंगोरी येथील इयत्ता सहावीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी डोंगराच्या पायथ्याला अभ्यास करताना.