जोडरस्त्यासाठी लष्कराची एनओसी नाही
By admin | Published: June 16, 2015 12:11 AM2015-06-16T00:11:51+5:302015-06-16T00:11:51+5:30
बोपखेल-खडकी तात्पुरत्या पर्यायी रस्त्यास खडकीच्या बाजूने कायमस्वरूपी डांबरी रस्ता तयार करण्यास, तसेच रस्ता वापरण्यास संबंधित
पिंपरी : बोपखेल-खडकी तात्पुरत्या पर्यायी रस्त्यास खडकीच्या बाजूने कायमस्वरूपी डांबरी रस्ता तयार करण्यास, तसेच रस्ता वापरण्यास संबंधित लष्करी विभागांनी आठवडा उलटूनही ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) दिलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात येथील कच्च्या रस्त्यावरून, तसेच अंधारातून ये-जा करणे नागरिकांना अधिक गैरसोयीचे ठरणार आहे.
बोपखेलच्या नागरिकांसाठी तात्पुरता पर्यायी रस्ता म्हणून बोपखेल विसर्जन घाटाला लागून ५१२ आर्मी बेस वर्कशॉपच्या मागील बाजूस तरंगता पूल बांधण्यात आला. कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या (सीएमई) लष्करी जवानांनी हा पूल बांधून नागरिकांसाठी खुला केला. खडकीच्या बाजूने जोडरस्ता करण्यासाठी बाभळीची झाडे काढून कच्चा रस्ता तयार केला. तो ५१२ वर्कशॉप वीज उपकेंद्राच्या बाजूने नेत वर्कशॉप रस्त्याला जोडण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी (दि. ७) झालेल्या जोरदार पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला. या चिखलात दुचाकी वाहने अडकून पडली, तसेच पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. पाऊस कमी होताच लष्कराच्या जवानांनी खडी टाकून रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली.
या संदर्भात ८ जूनला पुण्यात झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खडकी जोडरस्त्याचे डांबरीकरण, तसेच पथदिवे लावण्याचे काम पावसाळ्यापूर्वी होण्यासाठी संबंधित लष्करी विभागांना त्वरित एनओसी देण्याचे आदेश दिले होते. ५१२ आर्मी बेस वर्कशॉप, अॅम्युनिशन फॅक्टरी, डिफेन्स इस्टेट, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आदी लष्करी आस्थापनांना त्यांनी हे आदेश दिले. रस्ता पक्का करून त्याचे डांबरीकण करणे, तसेच पथदिवे लावण्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिका करणार आहे. हे काम एनओसीअभावी रखडले आहे. बैठक झाली, त्याच दिवशी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयास एनओसी देण्याबाबतचे पत्र लिहिले. जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व संबंधित लष्करी कार्यालयांना या संदर्भात त्वरित पत्र पाठविले आहे. मात्र, संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी आदेश देऊन आठवडा उलटूनही अद्याप एनओसी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे रस्ता डांबरीकरणाचे काम रखडले आहे. राज्यात सर्वत्र पावसाळा सुरू झाला आहे. शहरातही पावसाने हजेरी लावल्यास हे काम करता येणार
नाही. पाऊस थांबेपर्यंत प्रतीक्षा
करावी लागणार आहे. नाइलाजास्तव त्या काळात नागरिकांना
चिखलातून मार्गक्रमण करावे लागणार आहे. पाणी आणि चिखलामुळे वाहनांना येथून ये-जा करणे अशक्य होणार आहे. हा तात्पुरता मार्ग गैरसोयीचा ठरणार आहे.(प्रतिनिधी)
महापालिकेस एनओसी मिळाली नाही
५१२ आर्मी बेस वर्कशॉपच्या मागील बाजूचे सुमारे ५०० मीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण काम करणे, तसेच रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे लावण्यासाठी महपाालिकेला संबंधित लष्करी विभागांची एनओसी सोमवारी संध्याकाळपर्यंत मिळालेली नाही. या संदर्भात संबंधित लष्करी विभागांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय पत्रव्यवहार करीत आहे. एनओसी मिळताच काम सुरू केले जाईल. या कामासाठी किमान ३ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. - राजन पाटील, सहशहर अभियंता