खेड शिवापूर महावितरण कार्यालयात अधिकारीच नाही

By Admin | Published: July 8, 2017 02:01 AM2017-07-08T02:01:00+5:302017-07-08T02:01:00+5:30

हवेली तालुक्यातील शिवापूर येथील महावितरणच्या कार्यालयात गेले आठ दिवसांपासून ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी

There is no official in Khed Shivapur Mahavitaran's office | खेड शिवापूर महावितरण कार्यालयात अधिकारीच नाही

खेड शिवापूर महावितरण कार्यालयात अधिकारीच नाही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नसरापूर : हवेली तालुक्यातील शिवापूर येथील महावितरणच्या कार्यालयात गेले आठ दिवसांपासून ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी अधिकारी उपलब्ध होत नसल्याने शिवापूर परिसरात महावितरणविषयी नाराजीचा सूर वाढू लागला आहे.
शिवापूर (ता. हवेली) येथे महावितरणाचे कार्यालयात ग्रामस्थ आपल्या तक्रारी सोडविण्यासाठी व सांगण्यासाठी परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ गेले असता सदर कार्यालयात गेले आठ दिवस झाले अधिकारीच येत नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की माझी आठ दिवसांपूर्वी बदली झाली आहे. या गोष्टीला दहा दिवस झाले तरी अधिकारी म्हणून शिवापूर कार्यालयात कोणाचीही वर्णी लागली नाही. आमच्या अडचणी आम्ही कोणाला सांगायच्या, असा सवाल येथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी केला.
शिवापूर (ता. हवेली) येथे महावितरणचे ऊर्जाकेंद्र आहे. या केंद्रातून कल्याण, पेठ, मोरदारी, रहाटवडे, भिलारेवाडी, शिवतारवाडी, कोंढणपूर, अवसरेवाडी, आर्वी, सणसवाडी, खेड शिवापूर, शिवापूर, श्रीरामनगर (सर्व ता. हवेली) व भोर तालुक्यातील रांझे, कुसगाव, खोपी, शिवरे, कासुर्डी या सुमारे अठरा गावांना वीजपुरवठा केला जातो. एवढ्या मोठ्या केंद्रात जर दहा दिवस अधिकारी नसतील तर आणि काही अडचण झाल्यास सर्व गावांचा वीजपुरवठा खंडित होऊ शकतो, तसेच सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीवरील मोटारींना येथूनच वीजजोड असल्याने तीन ते चार दिवस नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे अनेक त्रस्त ग्रामस्थांनी सांगितले.
या सर्व अडचणींना नागरिक वैतागले असून सर्व गावांमध्ये महावितरणविषयी नाराजी आहे. येथील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत; परंतु त्या ठिकाणी अजूनही दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही. कल्याण ते शिवापूर या पट्ट्यात सुमारे आठ गावे आहेत. या गावांच्या देखरेखीसाठी किंवा काही विजेची अडचण असल्यास वायरमन नेमले आहेत. त्यांची संख्या फक्त तीनच आहे. जर आठ ते नऊ गावांसाठी तीन वायरमन असतील तर त्यांचे काय हाल होत असतील याची जाणीव बहुतेक महावितरणाला आलेली नसावी. त्यातच या वायरमनपैकी फक्त दोघेजणच विजेच्या खांबावर चढू व उतरू शकतात हे माहिती सर्व ग्रामस्थांना आहे. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहेच; पण त्यातील काही कर्मचारी हे अप्रेंटिस (शिकाऊ) आहेत, त्यामुळे उरलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असल्याचे चित्र आहे.

जास्तीचे बिल
ग्राहकांच्या माथी
आमच्या मीटरवरील रीडिंग घेऊन गेले की, बिलामध्ये फोटो व्यवस्थित दिसत नाही. परिणामी त्या महिन्याचे वीजबिल कमी जास्त दाखवतात. असे सलग तीन-चार महिने वीजबिल कमी जास्त देऊन त्यानंतर येणाऱ्या बिलामध्ये एकदम हजारोच्या रकमेचे बिल ग्राहकांच्या माथी मारले जाते. कारण त्यामध्ये युनिट वाढले की आपोआपच बिल हे पूर्वीच्या युनिट रेटपेक्षा अधिक असते. यावरून वीजबिलामध्येही सावळा गोंधळ चालल्याचे नागरिकांना दिसून येते.

आंदोलनाचा इशारा
शिवापूरच्या सरपंच व ग्रामस्थांनी लेखी निवेदन महावितरणला दिले आहे. निवेदनात तीव्र संताप व्यक्त करून लवकरात लवकर अधिकाऱ्याची नेमणूक करून ग्राहकांच्या अडचणी सोडवाव्यात, असे नमूद केले आहे, तसेच असे न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा तोंडी इशारा देण्यात आला आहे. या प्रसंगी सरपंच जयश्री दिघे, उपसरपंच अण्णा दिघे, भाजपाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र दिघे, राजू सट्टे, कसबे किरण, ग्रा. पं. सदस्या शारदा बारमुख आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: There is no official in Khed Shivapur Mahavitaran's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.