काय सांगता! पुणे जिल्ह्यातील तब्बल पावणे चार लाख मतदारांचा मतदार यादीत फोटोच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 08:58 PM2021-06-23T20:58:43+5:302021-06-23T20:59:17+5:30
मतदारांचे छायाचित्र गोळा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची विशेष मोहीम
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासन शंभर टक्के छायाचित्रयुक्त मतदार यादी तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु पुणे जिल्ह्यात अद्यापही तब्बल 3 लाख 79 हजार 933 मतदारांचे यादीत छायाचित्र नाही. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा छायाचित्र नसलेल्या मतदारांची छायाचित्र गोळा करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अद्यावतीकरण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे. आयोगाने शंभर टक्के छायाचित्र युक्त मतदार यादी तयार करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. पुणे जिल्ह्यात 78 लाख 87 हजार 874 एकूण मतदार आहेत. यापैकी 3 लाख 79 हजार 933 मतदारांची यादी छायाचित्र नाही. आयोगाच्या या छायाचित्र शोध मोहिमेनंतर देखील ज्या मतदारांचे छायाचित्र मिळणार नाही , अशी नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील 21 विधान सभा मतदार संघात मतदार यादी शुध्दीकरण मोहिम भारत निवडणूक आयोग यांच्या सूचनांनुसार राबविण्यात येत आहे. त्यानुसार मतदार यादीमध्ये नवीन मतदारांची नोंदणी करणे, मयत, स्थलांतरीत दुबार मतदारांची वगळणी करणे, मतदार यादीमध्ये नाव आहे. परंतु फोटो नाही अशा मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे, Logical Error ची दुरुस्ती करणे इत्यादी कामकाज सुरु आहे. यामुळे अशा मतदारांनी ८ दिवसांमध्ये आपली छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे अथवा मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे जमा करावे.
जे मतदार पुढील ८ दिवसांत छायाचित्र जमा करणार नाहीत अशा मतदारांची नावे भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार विहित कार्यपध्दतीचा अवलंब करुन त्यांची नावे मतदार यादीतून वगळणेत येतील याबाबत संबंधीत मतदारांनी नोंद घ्यावी. तसेच छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी (Residual Voters) मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयामध्ये पडताळणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचे वेबसाईट pune.nic.in / pune.gov.in या ठिकाणी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या यादीचे अवलोकन करुन आपले नाव यादीमध्ये असल्यास येत्या ८ दिवसांमध्ये आपले छायाचित्र संबंधित ठिकाणी जमा करावे. सदर कार्यक्रम कालमर्यादित आहे.
-----
यादीत छायाचित्र नसलेले मतदारांची तालुकानिहाय संख्या
जुन्नर- 28, आंबेगाव- 153, खेड-आंळदी - 503, शिरूर- 11202, दौड - 11583, इंदापूर- 7119, बारामती - 0, पुरंदर- 6183, भोर - 1583, मावळ - 2271, चिंचवड- 7476, पिंपरी- 13527, भोसरी - 3246, वडगाव शेरी - 70711, शिवाजीनगर- 30474, कोथरूड- 46889, खडकवासला - 47789, पर्वती- 23580, हडपसर- 50222, पुणे कॅन्टोन्मेंट- 29785, कसबा पेठ- 15909
एकूण- 379933