राज्यात कुठे नाही असे पोलिस ठाणे पुण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:13 AM2021-01-03T04:13:51+5:302021-01-03T04:13:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरेगाव पार्क सारख्या उच्चभू आणि गर्द झाडीने वेढलेल्या परिसरात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरेगाव पार्क सारख्या उच्चभू आणि गर्द झाडीने वेढलेल्या परिसरात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या गोलाकार अत्याधुनिक नव्या इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण झाले. ‘असे पोलिस स्टेशन राज्यात कुठेही नाही. राज्यातली सगळी पोलिस स्टेशन अशी झाली पाहिजेत,’ अशी प्रतिक्रीया पवार यांनी हे पोलिस ठाणे पाहिल्यानंतर व्यक्त केली. पोलीस महासंचालक हौसिंगने (डी.जी. हौसिंग) तयार केलेल्या निकषानुसार बांधलेली ही पुण्यातली पहिलीच इमारत आहे.
पोलिसांसाठी उपहारगृह, महिला पोलिसांसाठी विश्रांती कक्ष, नागरिकांसाठी स्वतंत्र हवेशीर बैठक व्यवस्था यासारख्या अनेक सुविधा असलेले हे पोलिस ठाण्याचा ‘लुक’ एखाद्या आयटी कंपनीसारखा कॉर्पोरेट आहे. देशविदेशातील पोलिस ठाण्यांचा अभ्यास करुन या पोलिस ठाण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे, अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर, पोलिस उपायुक्त सागर पाटील, मितेश घट्टे आदी उद्घाटनाला उपस्थित होते.
या परिसरात कुठूनही हे टुमदार पोलिस ठाणे लक्ष वेधून घेते. पोलिस ठाण्याच्या गोलाकार घुमटामध्येच इमारतीमध्ये हवा खेळती ठेवण्याची रचना करण्यात आली आहे. वाहनतळाची प्रशस्त व्यवस्था हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. उंच पायऱ्यांवरुन आत गेल्यावर प्रशस्त व्हरांडा आहे. स्वागत कक्षात नागरिकांसाठी हिरवळीवर खुर्च्या टाकण्यात आल्या आहेत.
पोलिसांच्या कामाचे स्वरुप पाहून प्रत्येक विभागासाठी किती जागेची आवश्यकता आहे याचा विचार करुन हे ठाणे बांधले आहे. प्रत्येक विभागातील गोपनीयता कायम राहून तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करणे सोयीचे व्हावे हा यामागचा हेतू आहे. या निकषानुसार प्रत्येक विभागासाठी जागा निर्धारित केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे विस्तृत कार्यालय आहे.
कोणत्याही पोलीस ठाण्यात गेल्यावर तेथे सर्वप्रथम मोठमोठे तक्ते दिसतात. त्यात पोलीस ठाण्यातील ‘क्राईम रेकॉर्ड’ असते. पण आता या पोलीस ठाण्यात ‘एलसीडी’वर हा सर्व डाटा दिसणार आहे. सर्वेलन्स, तपास पथक यांच्यासाठी स्वतंत्र खोल्या आहेत. त्याचबरोबर लॉक-ॲपही आहे. पहिल्या मजल्यावर पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे दालन, लेखनिक, पारपत्र, गुन्हे कारकून यांची स्वतंत्र दालने आहेत.
चौकट
“सर्व विभागांचा विचार करुन या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. येथील शांततेमुळे काम करायला हुरुप येतो. अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी उत्साहाने काम करत आहेत.”
-दिलीप शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोरेगाव पार्क पोलीस ठाणे.
चौकट
पोटाची सोय आणि क्षणभर विश्रांतीही
-या पोलीस ठाण्यात शंभराहून अधिकारी, कर्मचारी काम करतात. यांच्यासाठी तळमजल्यावर उपहारगृह आहे. एकावेळी २४ हून अधिक अधिकारी-कर्मचारी पोटपुजा करु शकतात.
-महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष तयार करण्यात आला आहे.