शरद पवार - प्रशांत किशोर भेटीमागे नवं राजकीय समीकरण?; अजित पवारांनी सांगितलं खरं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 12:08 PM2021-06-11T12:08:03+5:302021-06-11T12:25:38+5:30
प्रशांत किशोर यांनीच आपण राजकीय रणनीतीकार नसल्याचे केले जाहीर त्यामुळे ही भेट राजकीय नसल्याचा अजित पवारांचा दावा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा भेटीमध्ये कोणतीही राजकीय गणिते नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केला आहे. पुण्यामध्ये आज पत्रकार परिषदेत बोलताना पवारांनी हा दावा केला आहे.
राजकारण्यांचा हुकमी एक्का म्हणून ओळख असणाऱ्या प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट होते आहे. भाजप चे फाइंड असणाऱ्या किशोर यांनी गेल्या निवडणुकीत शिवसेनेसाठी काम केलं होतं. आता हेच किशोर पवारांना भेटायला आल्याने काही नवीन गणिते जुळत आहेत का याची चर्चा रंगली होती.
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र या भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचं म्हणलं आहे. पवार म्हणाले ," या भेटीमागे काही राजकारण नाही.स्वतः प्रशांत किशोर यांनीच हे जाहीर केले आहे की ते आता राजकीय रणनीतीकार म्हणून काम करणार नाहीत. त्यामुळे राजकारण करण्याचा संबंध येतच नाही. पवार साहेब अनेकांना भेटत असतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची भेट होत असते.तशीच ही भेट आहे"