चिंचबागेतील ठरल्याप्रमाणे २ एकर जागा घेण्यास हरकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:13 AM2021-02-24T04:13:07+5:302021-02-24T04:13:07+5:30

जेजुरी: येथील ऐतिहासिक चिंचेच्या बागेतील (गट नं. ६१२) मधील ७ एकर १० गुंठे जागा आचार्य अत्रे प्रतिष्ठान संस्थेने ...

There is no problem in taking 2 acres of land as planned in Chinchbag | चिंचबागेतील ठरल्याप्रमाणे २ एकर जागा घेण्यास हरकत नाही

चिंचबागेतील ठरल्याप्रमाणे २ एकर जागा घेण्यास हरकत नाही

Next

जेजुरी: येथील ऐतिहासिक चिंचेच्या बागेतील (गट नं. ६१२) मधील ७ एकर १० गुंठे जागा आचार्य अत्रे प्रतिष्ठान संस्थेने महाविद्यालयासाठी रीतसर खरेदीखताने १९९८ साली घेतली आहे. याच जागेत शरदचंद्र पवार महाविद्यालय सुरू असून सध्या तेथे ग्रामीण भागातील गोरगरिबांची ६०० मुली व मुले शिक्षण घेत आहेत. या ७ एकर १० गुंठ्यापैकी २ एकर जागा आरक्षण समितीने आरक्षित केली असून सदरील जागा नगरपालिकेने संस्थेला मोबदला देऊन भाविकांच्या सोईसुविधेसाठी भूसंपादन प्रक्रिया राबवून ताब्यात घ्यावी. त्याला प्रतिष्ठानची कोणतीही हरकत नसल्याचे संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते यांनी सांगितले.

सोमवारी (दि. २२) जेजुरीकर ग्रामस्थ, मानकरी, विश्वस्त यांची माघ पौर्णिमा यात्रा उत्सवाचे निर्णय घेण्यासंदर्भात बैठक झाली होती. त्या वेळी चिंचेच्या बागेतील ५ एकर जागा नगरपालिकेने आरक्षण टाकून भाविकांच्या कुलधर्म -कुळाचारासाठी ठेवावी किंवा देवसंस्थानने या जागेबाबत लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. तशा प्रकारच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. याला उत्तर देताना कोलते यांनी स्पष्टीकरण दिले.

विजय कोलते म्हणाले की, महाविद्यालयाच्या इमारतीची परवानगी घेताना महाविद्यालयाची इमारत क्रीडांगण, सार्वजनिक कार्यक्रम व भाविकांच्या धार्मिक विधींसाठी ५ एकर १० गुंठे जागा ठेवण्यात येऊन उर्वरित २ एकर जागा नगरपालिकेने आरक्षित करावी, असे पत्र संस्थेने दिले होते. महाविद्यालय सुरू करताना किमान ५ एकर जागा संस्थेची असावी, असा विद्यापीठाचा नियम आहे. तरच महाविद्यालयाला परवानगी देण्यात येते. तसेच पुढील काळात महाविद्यालयाच्या आणखी दोन शाखांचा विस्तार हॉस्टेल वगैरे सुविधा करण्यात येणार आहेत. त्यामुळे संस्थेला किमान ५ एकर जागा असावी. २०१७ मध्ये शासनाकडून आरक्षण समिती जाहीर करण्यात येऊन बैठक घेण्यात आली होती.

या बैठकीला प्रशासनातील उपसचिव केळकर व जेजुरी नगरपालिकेचे तत्कालीन प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्येही ७ एकर १० गुंठ्यापैकी २ एकर जागेत आरक्षण ठेवा असे आमच्या संस्थेने नमूद केले होते, त्यास मान्यताही मिळालेली आहे. तदनंतर, २ ऑगस्ट २०१७, १२ मे २०१८, व १२ डिसेंबर २०१९ रोजी आरक्षण मंजूर केले असल्याचे व आचार्य अत्रे प्रतिष्ठानला योग्य मोबदला देऊन भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याचे पत्र दिलेले आहे. त्यामुळे चिंचेच्या बागेतील जागा भूसंपादन करण्यास आमची कोणतीही हरकत नाही.

तसेच नगरपालिका किंवा देवसंस्थान यापैकी कोणी जागा घ्यावी, हा प्रश्न या दोन्ही संस्थांनी आपआपसात चर्चा करून ठरवावे, असेही कोलते म्हणाले.

Web Title: There is no problem in taking 2 acres of land as planned in Chinchbag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.