स्मारकांचा प्रश्न रखडलेलाच, अर्थसंकल्पात तरतूद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 05:35 AM2018-03-10T05:35:38+5:302018-03-10T05:35:38+5:30
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, महाराष्ट्रवाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष व नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबविण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, महाराष्ट्रवाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष व नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबविण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे वेंगुर्ला येथे तर ज्येष्ठ रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी यांचे
सिंधुदुर्ग येथे स्मारक उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला असून, पु.ल. आणि गदिमांच्या स्मारकांची दखल न घेण्याच्या राजकीय उदासीनतेमुळे रसिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत
आहे.
येत्या ८ नोव्हेंबरपासून पुलंच्या, १ आॅक्टोबरपासून गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाला २३ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. या दिग्गज साहित्यिकांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या स्मृती कायम जपण्याच्या उद्देशाने स्मारक उभारणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, सरकारकडून गेल्या अनेक वर्षांमध्ये स्मारकांच्या कामाची दखल घेण्यात आलेली नाही.
आपल्या अलौकिक कर्तृत्वाने मराठी साहित्य व चित्रपटसृष्टीत गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमांनी मोलाचे योगदान दिले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी गदिमांचे स्मारक करू, असे आश्वासन दिले होते. महाराष्ट्र सरकारतर्फे गदिमा स्मारक समिती नेमण्यात आली. माडगूळकर कुटुंबीयांना विश्वासात न घेता राजकीय दबावापोटी शेटफळे येथे स्मारक करण्यात आले. केवळ काम उरकायच्या उद्देशाने काही बांधकाम उरकण्यात आले. स्मारकाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवण्यात आले. मात्र, यावर नंतर कोणतेही काम हाती घेण्यात आले नाही.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे आणि विलेपार्ले यांचे अतूट नाते आहे. पुणे ही तर पुलंची कर्मभूमी. मात्र, तरीही पु. ल. देशपांडे यांचे एकही स्मारक आजवर उभारण्यात आलेले नाही. जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या स्मारकाचे काम हाती घेण्याची संधी सरकारकडे होती. मात्र, अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही तरतूद करण्यात न आल्याने अपेक्षाभंग झाल्याची प्रतिक्रिया साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे.
ंअर्थसंकल्पाने काय दिले?
आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधिस्थळावर स्मारक करण्यासाठी संगमवाडी येथे जागा आरक्षित होती. राज्य सरकारने हे आरक्षण कायम केल्याने त्या जागेवर स्मारक उभारणीसाठी १.५ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.
आद्य क्रांतिवीर उमाजी
नाईक स्मारकासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापुरुषांचे साहित्य वेब पोर्टलद्वारे प्रकाशित करण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला असून, यासाठी ४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
पु.ल., गदिमा, गोविंदाग्रज यांचे साहित्यसृष्टीतील योगदान मोलाचे आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी कार्यक्रम करण्याच्या निमित्ताने ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र, स्मारकाचा विषय जास्त महत्त्वाचा होता. स्मारकांच्या उभारणीचे काम हेच सारस्वतांना अभिवादन ठरले असते.
- प्रा. मिलिंद जोशी,
कार्याध्यक्ष, मसाप
अर्थसंकल्पात पु.ल., गदिमा, गोविंदाग्रज यांसारख्या दिग्गजांचे स्मरण ठेवण्याचे भान सरकारला आले, हीच मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्रासह बृहन्महाराष्ट्रातही त्यांचे चाहते आहेत. यादृष्टीने सर्वत्र साहित्यिक उपक्रम राबवले जावेत, अशी अपेक्षा आहे. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने स्मारकाच्या आराखड्यावर विचार केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अर्थसंकल्पात तरतूद करण्यात न आल्याने अपेक्षाभंगाचे दु:ख आहेच.
- श्रीधर माडगूळकर