पितृपंधरवड्यात भाज्यांना उठाव नाही, मागणी घटली अन् दर घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 01:58 AM2018-10-01T01:58:42+5:302018-10-01T01:59:03+5:30

भाज्यांचे दर पडले : गवार, भेंडी, भोपळा, कारली दरात १० ते १५ टक्क्यांची घट

There is no raise in the paternity of the fathers, demand declined and rates declined | पितृपंधरवड्यात भाज्यांना उठाव नाही, मागणी घटली अन् दर घसरले

पितृपंधरवड्यात भाज्यांना उठाव नाही, मागणी घटली अन् दर घसरले

Next

पुणे : पितृपंधरवड्यात फळभाज्यांची मागणी चांगलीच वाढते, यामुळे दरामध्येदेखील चांगलीच तेजी येते. परंतु यंदा प्रथमच पितरांच्या भाज्यांना म्हणजे गवार, भेंडी, तांबडा भोपळा, कारली, काकडी, मेथी आदी भाज्यांना उठावच नसल्याचे चित्र मार्केट यार्डमध्ये पाहिला मिळले. या भाज्यांची आकव चांगली असली तरी मागणी नसल्याने दरामध्ये १० ते १५ टक्क्यांनी घट झाली आहे. दरम्यान मागणी वाढल्याने आल्याचा दरात वाढ झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डांतील तरकारी विभागात रविवार (दि. ३०) सुमारे १५० ते १६० ट्रक शेतमालाची आवक झाली. यामध्ये स्थानिक आणि परराज्यातील शेतमालाचा समावेश आहे. परराज्यातून प्रामुख्याने कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ते ५ ट्रक कोबी, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून २० ते २२ टेम्पो हिरवी मिरची, बेंगलोर येथून २ टेम्पो आले, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून २ ते ३ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची साडेचार हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले १४०० ते १५०० पोती, टॉमेटोे साडेपाच ते सहा हजार पेटी, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी १४ ते १५ टेम्पो, गवार ७ ते ८ टेम्पो, भेंडी १० ते १२ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, हिरवी मिरची ७ ते ८ टेम्पो, मटार २०० गोणी, पावटा ५ ते ६ टेम्पो, भुईमूग २०० पोती, कांद्याची ७० ते ७५ ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून बटाट्याची ५० ते ५५ ट्रक इतकी आवक झाली.

प्रथमच पितृपक्षात भाज्यांच्या मागणीत घट
गेल्या अनेक वर्षांपासून पितृपक्षात सर्वच प्रकारच्या फळभाज्यांची मागणी वाढते. यामध्ये प्रामुख्याने गवार, भेंडी, तांबडा भोपळा, कारली, मेथी या भाज्यांना चांगली मागणी असते. यामुळे दरवर्षी पितृपक्षात फळभाज्या तेजीत असतात. परंतु यंदा प्रथमच पितरांच्या भाज्यांची मागणी घटली असून, दरदेखील पडले आहेत. याबाबत व्यापारी आणि शेतकऱ्यांनादेखील आश्चर्य वाटत आहे.
- विलास भुजबळ, अध्यक्ष,
अडते व्यापारी असोसिएशन

पालेभाज्या तेजीत
मार्केट यार्डातील तरकारी विभागात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची आवक वाढली आहे. दरम्यान, कांदापात, चाकवत आणि पुदीना वगळता सर्व पालेभाज्यांच्या भावात तेजी कायम आहे. मागील आठवड्याइतकीच रविवारी कोथिंबिरीची दीड लाख व मेथीची ६० हजार जुडींइतकी आवक झाली. येथील घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या जुडीला ५ ते १२ रुपये, तर मेथीला ६ ते १० रुपये भाव मिळत आहे, तर ८ ते २० रुपये भावाने दोन्ही भाज्यांच्या जुडीची विक्री किरकोळ बाजारात होत आहे.

Web Title: There is no raise in the paternity of the fathers, demand declined and rates declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.