पगड्या बदलणाऱ्यांना उत्तर द्यायचे कारण नाही - विनोद तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 11:47 PM2018-07-02T23:47:59+5:302018-07-02T23:48:08+5:30
शरद पवार यांच्यासारखे अभ्यासू नेते निवडणुका जवळ आल्या की बहुजन समाजाच्या मतांचे गणित डोळ्यांसमोर ठेवून काहीही वक्तव्ये करतात.
पुणे : शरद पवार यांच्यासारखे अभ्यासू नेते निवडणुका जवळ आल्या की बहुजन समाजाच्या मतांचे गणित डोळ्यांसमोर ठेवून काहीही वक्तव्ये करतात. मतांवर डोळा ठेवून पगड्या बदलणा-यांच्या पत्राला मी उत्तर देण्याचे कारण नाही, अशा शब्दांत राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी निशाणा साधला. शुल्क नियंत्रण कायदा अंतिम टप्प्यात असून, येत्या अधिवेशनात त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे, असे सूतोवाचही त्यांनी केले.
राज्य सरकारने शाळा बंदचा घेतलेला निर्णय हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. महाराष्ट्राच्या शिक्षण परंपरेशी हा निर्णय पूर्णपणे विसंगत आहे, असे सांगत राज्य सरकारशी पत्रव्यवहार केल्याचेही त्यांनी सांगितले होते. याबाबत विचारणा केली असता, तावडे यांनी पवार यांच्या वक्तव्याचा पत्रकारांशी बोलताना समाचार घेतला. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर आमचा भर आहे, असेही त्यांनी सांगितले.
आॅनलाइन शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत किती जागा उपलब्ध आहेत, हे नुकतेच ग्राम विकास खात्याने कळविले आहे. त्या जागांसाठी लवकरच वित्त विभागाकडून मान्यता घेण्यात येईल. पवित्र पोर्टलवरील पुढील टप्पा १५ दिवसांत सुरू होईल, अशी माहिती तावडे यांनी दिली.
‘सिंबायोसिस’चा पदवीप्रदान सोहळा
डिग्री, नोकरी, छोकरीची मानसिकता आता बदलायला हवी. विद्यार्थ्यांनी पठडीतल्या शिक्षणपद्धतीवर अवलंबून न राहता शिक्षणाबरोबरच कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन विनोद तावडे यांनी सिंबायोसिस कला व वाणिज्य माहविद्यालयाच्या तिसºया पदवी प्रदान सोहळ्यात केले. महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्डाची स्थापना केली असून, त्याअंतर्गत पुढील वर्षात १०० शाळा सुरु करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बाद झाली, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. साहित्य संमेलन यापुढे कोणत्याही वादाशिवाय पार पडेल आणि रसिकांना साहित्याचा निखळ आनंद घेता येईल.
- विनोद तावडे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री