प्रत्येक गटासाठी स्वतंत्र मतदान यंत्र नाहीच
By admin | Published: February 19, 2017 04:30 AM2017-02-19T04:30:21+5:302017-02-19T04:30:21+5:30
प्रभागातील प्रत्येक गटासाठी स्वतंत्र मतदान यंत्र ठेवण्याची राजकीय पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने अमान्य केल्यामुळे आता सर्व गट व त्यांचे उमेदवार एक किंवा
पुणे : प्रभागातील प्रत्येक गटासाठी स्वतंत्र मतदान यंत्र ठेवण्याची राजकीय पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने अमान्य केल्यामुळे आता सर्व गट व त्यांचे उमेदवार एक किंवा दोन यंत्रावरच असणार आहे. निवडणूक प्रशासनाने सुमारे ११ हजार मतदान यंत्रांची व्यवस्था केली आहे.
एका प्रभागात चार सदस्य याप्रमाणेच प्रथमच निवडणूक होत आहे. मतदाराला एका वेळी चार मते द्यावी लागणार आहेत. त्यासाठी चार स्वतंत्र मतदान यंत्र ठेवावीत अशी मागणी भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षांनी केली होती. मात्र ती अमान्य झाली. आता एका यंत्रावरची जागा संपली की दुसरे यंत्र याप्रमाणे रचना करण्यात अली आहे. त्यामुळे एका मतदान केंद्रात साधारण ३० पेक्षा जास्त उमेदवार असतील तरच तीन यंत्रे लागतील, अन्यथा २ यंत्रांमध्येच सर्व उमेदवार व चारह गट सामावून घेतले जातील.
प्रशासनाने एकूण मतदानासाठी ४ हजार कंट्रोल युनिट, १० हजार ९९९ बॅलेट युनिट, ३ हजार ८८९ मेमरी युनिट आणि ३ हजार ८०० बॅटरीची व्यवस्था केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना यंत्र कसे वापरायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. चार वेळा मतदान केल्याशिवाय मतदान प्रक्रिया पुर्णच होणार नाही.