शिवसृष्टी नाही, तर मेट्रोही नाही, पदाधिका-यांचा करणारच असा ठाम निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:32 AM2017-11-22T01:32:53+5:302017-11-22T01:33:57+5:30
पुणे : कोथरूड येथील नियोजित शिवसृष्टीसाठीची बैठक होत नसल्याने महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना या विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला.
पुणे : कोथरूड येथील नियोजित शिवसृष्टीसाठीची बैठक होत नसल्याने महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना या विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला. ‘शिवसृष्टी करीत नसाल तर मेट्रोही होऊ देणार नाही,’ असा इशारा देण्यात आला. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाºयांनी यावर ‘बैठक लवकरच होईल; आम्हालाही शिवसृष्टी हवीच आहे,’ असे सांगितले.
तीन महिन्यांपूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांनी याबाबत पुढाकार घेऊन मुंबईत बैठक घेतली होती. तीत कोथरूड येथील मेट्रोच्या जागेवर शिवसृष्टी व मेट्रो स्थानक होईल का, याची तांत्रिकदृष्ट्या पाहणी करण्याचे ठरले होते. मात्र, त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौºयावर होते. त्यांच्यासमवेत या विषयावर बैठक घेणार, असे मंत्री बापट यांनी सांगितले; पण ३ महिने होत आले तरीही ही बैठक व्हायला तयार नाही. त्यानंतर मुख्यमंत्रीच दोन वेळा पुण्यात येऊन गेले; पण तरीही बैठक झालीच नाही.
दरम्यानच्या काळात महापालिकेने दोन वेळा खास शिवसृष्टीसाठी म्हणून विशेष सभा आयोजित केली व बैठक झाली नाही, असे कारण देत तहकूबही केली. मंगळवारची विशेष सभाही तहकूबच करण्यात येणार होती; मात्र शिवसृष्टीसाठी आग्रही असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक मानकर यांनी सभा तहकूब करण्याला विरोध केला. त्यानंतर सर्वच विरोधी सदस्यांनी सभा तहकूब करू देणार नाही असे सांगितले.
यावर सदस्यांना बोलू द्या, असा आग्रह धरत मानकर यांनी ‘शिवसृष्टी तुम्हाला करायची आहे किंवा नाही ते एकदा स्पष्ट करा; म्हणजे आम्हालाही निर्णय घेता येईल,’ असे बजावले. तीन महिने बैठक घेता येत नसेल, तर याचा अर्थ तुम्हाला पुणेकरांची फसवणूक करायची आहे का, असा सवाल त्यांनी केला. शिवसृष्टीबाबत असे काही करणार असाल, तर शिवप्रेमी नागरिक मेट्रोही होऊ देणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.
काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी अशा महत्त्वाच्या विषयासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू शकत नसाल तर काय उपयोग, अशी टीका करून काँग्रेस शिवसृष्टीसाठी आग्रही असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेचे संजय भोसले यांनी तर शिवछत्रपतींचे नाव घेत सत्तेवर आलात; मग आता उशीर का करीत आहात, अशी थेट विचारणा केली.
मनसेचे वसंत मोरे यांनीही पुणेकरांची फसवणूक करू नका, असे सांगितले. गफूर पठाण, अविनाश बागवे तसेच अन्य अनेक सदस्यांना यावर बोलायचे होते; मात्र सभागृहनेत्यांनी नकार देऊन आता गटनेते बोलले आहेत; अन्य कोणी नको, असे सांगितले.
वर्षा तापकीर पीठासीन अधिकारी
महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे दोघेही सभेला अनुपस्थित होते; त्यामुळे वर्षा तापकीर यांची पीठासीन अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. महापौर म्हणून त्यांना सन्मान देण्यात आला म्हणून सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. ‘पुढच्या महापौर’ अशी कुजबुज लगेचच सुरू झाली.
विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी ते मान्य करून या विषयावर त्वरित मुख्यमंत्र्यासमवेत बैठक घ्यावी, अशी मागणी गेली. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी या विषयावर राजकारण करू नका असे सांगितले. आम्हाला शिवसृष्टी करायचीच आहे, ती कोथरूडमध्येच होईल व त्यासंबधीची बैठकही लवकरच होईल, असे स्पष्ट केले. सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनीही विरोधकांना यावर इशारे वगैरे देणे योग्य नाही, असे बजावले व लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.