‘शोभेच्या’ फटाक्यांकडे ओढा, उत्साहात कुठेही कमतरता नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 01:45 AM2018-11-05T01:45:01+5:302018-11-05T01:45:34+5:30
कपडे, खानपानाच्या गोष्टी, इलेक्ट्रॉनिक वस्तूच नव्हे, तर दिवाळीत बच्चे कंपनीचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या फटाक्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
पुणे : कपडे, खानपानाच्या गोष्टी, इलेक्ट्रॉनिक वस्तूच नव्हे, तर दिवाळीत बच्चे कंपनीचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या फटाक्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे फटाके खरेदीवर जीएसटीदेखील आकारला जात असल्याने नागरिकांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे. मात्र अनेकांनी फटाका स्टॉलवर खरेदीस पसंती दिल्याचेही दृश्य बाजारपेठांमध्ये होते.
सर्वाेच्च न्यायालयाने फटाके उडवण्यासाठीच्या वेळेमध्ये बंधने आणली असली तरी फटाके उडविण्याचा नागरिकांचा उत्साह कुठेही कमी झाला नाही. सध्या शहरातील विविध भागांमध्ये फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. यंदा मात्र जास्त आवाज करणाºया फटाक्यांपेक्षा शोभेचे फटाके मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल झाले आहेत. असे असले तरी या फटाक्यांची किंमत अधिक असून त्यात जीएसटीसुद्धा आकारला जात असल्याने फटाक्याच्या किमती यंदा कमालीच्या वाढल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री यांचे छायाचित्र असलेले फटाके ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. केवळ बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूड, टॉलिवूडमधील कलाकारांच्या नावांचे फटाके आहेत.
नदीपात्रामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही फटाक्यांचे मोठ्या प्रमाणावर स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलमध्ये २५० रुपयांपासून ते दीड-दोन हजारांपर्यंतचे फटाके विक्रीस उपलब्ध आहेत. यात आवाज करणाºया फटाक्यांचे प्रमाण कमी असून शोभेच्या फटाक्यांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर चित्रपट कलाकारांच्या नावांचे, तसेच त्यांचे फोटो असलेले फटाकेसुद्धा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यात कतरिना कैफ, करिना कपूर यांच्याबरोबरच बाहुबली फटाकासुद्धा विक्रीस ठेवण्यात आला आहे. आकाशात उडवल्या जाणाºया फटाक्यांना यंदा विशेष मागणी आहे.
फटाकाविक्रेते हर्षल भोकरे म्हणाले, की यंदा फटाक्यांच्या किमती कमालीच्या वाढल्या आहेत. त्यातच जीएसटीसुद्धा आकारला जात असल्याने जादा किंमत नागरिकांना मोजावी लागत आहे. तसेच यंदा मोठा आवाज करणाºया फटाक्यांपेक्षा शोभेचे अनेक फटाके दाखल झाले आहेत. ग्राहकांकडूनही शोभेच्याच फटाक्यांना मागणी आहे. परंतु दरवर्षीच्या तुलनेत यंदा फटाके घेण्यासाठी गर्दी कमी झाली आहे.