‘ऑक्सिजन’ समस्येवर तोडगा निघेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:11 AM2021-04-22T04:11:52+5:302021-04-22T04:11:52+5:30
पुणे : शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांकडून ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. मात्र, मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नाही. जिल्हा प्रशासनाकडे ...
पुणे : शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांकडून ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. मात्र, मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नाही. जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने पालिकेचे अधिकारीही हतबल झाल्याचे चित्र आहे. पालिकेची मागणी ५० टनांवर पोचली असून अद्याप सात ते आठ टनांचा तुटवडा भासत आहे.
व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवरील रुग्ण वाढत असल्याने लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. काही खासगी हॉस्पिटलला ऑक्सिजनच मिळत नसल्यामुळे रुग्ण हलवण्याची वेळ आली आहे. पालिकेलाही रुग्णांना ऑक्सिजन पुरविताना कसरत करावी लागत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा, रेमडेसिविर आणि खाटांच्या उपलब्धतेबाबत महापौर मुरलीधर मोहळ यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्वपक्षीय गटनेते, पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. पालिकेची मागणी आणि पुरवठा अगदी ''कट टू कट'' सुरू आहे. ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत झाला नाही तर रुग्णांच्या प्राणावर बेतू शकते. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे. वारंवार मागणी करूनही पुरवठा होत नसल्याने अधिकारी चिंतेत आहेत. प्रशासनाला ऑक्सिजनसाठी आाटोकाट प्रयत्न करावे लागत आहे. खासगी रुग्णालयांची अवस्था यापेक्षा वाईट आहे. मंगळवारी शहरातील दहापेक्षा जास्त खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. पालिका प्रशासनाला लक्ष घालून या रुग्णालयांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करावे लागले.